अबुजा : ( Nigeria Massacre ) नायजेरियाच्या वायव्येकडील झामफारा राज्यातल्या एका खाण गावावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान २० जणांचा मृत्यू झाला असून, डझनभर जण जखमी झाले आहेत. दान गुल्बी जिल्ह्यातील गोबिरावा चाली गावात मोटारसायकलवर आलेल्या या बंदूकधाऱ्यांनी, प्रथम सोन्याच्या खाणीवर हल्ला चढवत तिथे १४ लोकांचा जीव घेतला. त्यानंतर गावात फिरून घरांमध्ये आणि मशिदीत घुसून हत्याकांड ( Nigeria Massacre ) सुरू ठेवले.
या हल्ल्यामागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र नायजेरियाच्या संघर्षग्रस्त उत्तर भागात डाकू गटांनी अशा प्रकारच्या हिंसक घटनांमध्ये वाढ केली आहे. हे गट बहुतांश माजी मेंढपाळ असून, स्थायिक समुदायांशी असलेल्या संघर्षातून ते अशा प्रकारची कृत्ये करतात. नायजेरियाच्या खनिज समृद्ध वायव्य प्रदेशात कमकुवत सुरक्षा यंत्रणेचा फायदा घेत या गटांनी गावांवर आणि मुख्य रस्त्यांवर सतत हल्ले केले आहेत. दान गुल्बी जिल्ह्यातील नागरिकांवर या आधीही अनेकदा असे हल्ले झाले असून, लोक सतत भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. अनेक लोक बेपत्ता असल्याचीही माहिती समोर आली आहे.