Political Clashes : राजकीय वैर वाढतंय, मतभेदांच्या भडिमारात परंपरेची मुळं हादरली !

26 Apr 2025 16:43:45

political
 
नागपूर : ( Political Clashes ) गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात वैचारिक मतभेद वैयक्तिक स्तरावर पोहोचले आहेत. आता परिस्थिती इतकी बिघडली आहे की, या मतभेदांनी थेट कार्यकर्त्यांच्या जीवावर बेतायला सुरुवात केली आहे. केवळ नेते नव्हे, तर कार्यकर्तेही आता विरोधकांवर चढाई करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. महाराष्ट्राच्या सभ्य राजकीय परंपरेला हे मोठं आव्हान ठरत आहे.
 
नेते आपल्या कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते थेट हातघाईवर उतरू लागले आहेत. एखाद्या पक्षाच्या कार्यालयावर दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते आक्रमण करण्यासही मागे हटत नाहीत. हीच परिस्थिती राहिली तर, आगामी निवडणुकीपर्यंत पक्षांचे कार्यालयं रणभूमीतच परिवर्तित होतील, अशी स्थिती निर्माण ( Political Clashes ) होऊ शकते.
अलीकडे काँग्रेसने भाजपच्या धंतोली कार्यालयाजवळ आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याला प्रत्युत्तर देताना भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी देवडिया येथील काँग्रेस कार्यालयाच्या दिशेने मोर्चा वळवण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहराचे राजकीय वातावरण तापले.
 
‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात भाजप युवा मोर्चाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. त्यानंतर काही कार्यकर्ते अतिउत्साहात देवडिया कार्यालयाच्या दिशेने धावले. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वाद वाढून थेट धक्काबुक्कीपर्यंत गेला. परिणामी, काही काळ तणावाचं वातावरण निर्माण ( Political Clashes ) झालं.
 
या साऱ्या प्रकारात कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेले तीव्र आणि उग्र विचार भविष्यात अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतात. काही जणांनी तर "देवडिया घुसू शकतो, हे दाखवून दिलं," असे विधान करून आपला हेतू स्पष्ट केला. विरोध रस्त्यावर करण्याची परंपरा असली तरीही त्याला काही नैतिक व कायदेशीर मर्यादा हव्यात.
 
विरोधाच्या अनेक माध्यमांतून वैचारिक मतभेद मांडता येतात, मात्र सार्वजनिक ठिकाणी आक्रमकता दाखवताना संयम आवश्यक असतो. अन्यथा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. याचप्रमाणे काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनीही भाजप कार्यालयावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलिसांनी त्यांना अडवलं आणि आंदोलन शांतीपूर्णरीत्या संपवण्यात आलं. दोन्ही पक्षांकडे मोठ्या प्रमाणावर जनाधार आहे, त्यामुळे त्यांच्याकडून मतदारांच्या मोठ्या अपेक्षा असतात. मात्र नेत्यांची वाचाळवृत्ती, कार्यकर्त्यांचे आक्रमक वर्तन आणि रस्त्यावरचा संघर्ष हे सगळं लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण ( Political Clashes ) करत आहे.
 
नेते आणि मंत्री यांना थोपवणार कोण ?
 
राज्यात गेल्या काही वर्षांत सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही बाजूंनी आक्रमक विधानं, व्यक्तिगत टीका आणि असभ्य भाषेचा वापर वाढला आहे. नेत्यांच्या वर्तनाचा थेट परिणाम कार्यकर्त्यांच्या वृत्तीवर होत आहे. कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांचे अनुकरण करत असून, त्यामुळे संघर्ष अधिक तीव्र होत आहे.
 
राजशिष्टाचाराचे भान पुन्हा निर्माण व्हावे
 
महाराष्ट्रात "राजशिष्टाचार" ही संकल्पना आदरपूर्वक जपली जाते. मात्र ती राजकीय वागणुकीतही दिसणं आवश्यक आहे. कार्यकर्त्यांना आक्रमक आंदोलन करण्याऐवजी जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्याबद्दल जागरूकतेने आंदोलन करावे, यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याची वेळ आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0