Quetta IED Blast : पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट ! बीएलएने घेतली १० सैनिकांच्या मृत्यूची जबाबदारी

26 Apr 2025 21:38:51
 
pakistan
 
इस्लामाबाद : ( Quetta IED Blast ) पाकिस्तानच्या क्वेटा शहरात झालेल्या आयईडी स्फोटात १० पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. क्वेटाच्या मार्गट परिसरात पाक लष्कराच्या ताफ्यावर रिमोट-कंट्रोलद्वारे स्फोट घडवून आणण्यात आला. बीएलएच्या प्रवक्त्या जियंद बलुच यांनी सांगितले की, या हल्ल्यात लष्कराचे वाहन पूर्णतः उद्ध्वस्त झाले आणि त्यामधील सर्व १० सैनिक जागीच ठार झाले. या घटनेने बलुचिस्तानमध्ये पुन्हा एकदा अस्थिरता निर्माण ( Quetta IED Blast ) केली आहे.
 
बीएलएचा पुढील हल्ल्यांचा इशारा
 
यापूर्वी बीएलएने जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण केले होते. आता बीएलएने पुन्हा एकदा इशारा दिला आहे की आगामी काळात आणखी हल्ले घडवून आणले जातील. या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे आणि तपास सुरू आहे.
 
लाहोर विमानतळावर दुर्घटना
 
दरम्यान, लाहोर विमानतळावर पाकिस्तान लष्कराच्या विमानाला शनिवारी आग लागल्याची घटना घडली. विमान उतरत असताना टायरमध्ये आग लागली आणि त्यामुळे सर्व उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली. धावपट्टीही काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही आणि या घटनेची चौकशी सुरू आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0