नागपूर : ( Missing Newlywed ) खापा गावातील २६ वर्षीय तरुणाने विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी बेपत्ता झालेल्या पत्नीच्या शोधासाठी नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. तरुणाचा आरोप आहे की, वडिलांनी हृदयविकाराचा बहाणा करून पत्नीला घरी बोलावून नेले आणि ती तेव्हापासून अदृश्य आहे. वकील ए. ई. निमगडे यांच्या माध्यमातून दाखल याचिकेनुसार, विवाहानंतर अवघ्या एका दिवसात नवदाम्पत्य वेगळं करण्यात आलं. पत्नीने गुप्त भेटीत वडिलांचा आजार हा फसवा असल्याचे सांगितल्याचा दावा पतीने ( Missing Newlywed ) केला आहे.
पत्नीवर मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचेही त्याने याचिकेत नमूद केले आहे. तसेच, सासरच्या मंडळींच्या दबावामुळे पत्नीला दुसऱ्या लग्नात ढकलले जाण्याची भीती असल्याचे सांगितले आहे. पत्नीने एका चिठ्ठीत ‘मला घेऊन जा, नाहीतर मी मरून जाईन’ असे लिहिले असल्याचा पुरावाही सादर केला आहे.
न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने सासरच्या मंडळींना नोटीस बजावली असून, २९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. तरुणाने तक्रारीत पोलिसांवरही पत्नीशी संपर्क साधण्यास मज्जाव केल्याचा आरोप केला असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीनंतरही कारवाई न झाल्याचे नमूद केले आहे.