नागपूर : ( Teacher Recruitment Scam ) बोगस शिक्षक भरती व बनावट शालार्थ आयडी या प्रकरणात सदर पोलिसांनी सात ते आठ जणांना अटक करून त्यातून अनेक शिक्षकांचे बनावट दस्तऐवजांच्या आधारे बोगस प्रस्ताव तयार करून नोकरी देण्यात आल्याचे समोर आले. याशिवाय अनेक शिक्षकांचे बनावट आयडी तयार करून त्यांना पगार देत, शासनाचे कोट्यवधी रुपये बुडविल्याची बाब समोर आली. दरम्यान शिक्षकांना नोकरी देताना मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची शंकाही व्यक्त करण्यात आली.
बोगस शिक्षक भरती व बनावट शालार्थ आयडी प्रकरणात आतापर्यंत शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक नीलेश मेश्रामसह पाच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कोट्यवधींची उलाढाल झाल्याचाही संशय आता व्यक्त करण्यात ( Teacher Recruitment Scam ) येत आहे.
ईडीची एन्ट्री
आता यात केंद्रीय प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) एन्ट्री केली आहे. हा घोटाळा 100 कोटींच्यावर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच ईडीने सर्व आरोपींच्या मालमत्तेची माहिती मागविली आहे. याबाबतचे पत्र सदर पोलिसांना आले आहे. ईडीची एंट्री झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. त्यातूनच 'ईडी'द्वारे नागपूर कार्यालयाचे साहाय्यक संचालक यांनी सदर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनीष ठाकरे यांना प्रकरणाची संपूर्ण माहिती आणि त्याबाबतचे दस्तऐवज, आरोपींची बँक अकाऊंटचा तपशील, संपत्तीची माहिती, पोलिस कोठडी आणि इतर माहिती मागविल्याचे सूत्रांकडून समजते.