मुंबई : ( Wadettiwar Controversial Statement ) पहलगाम दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या झाडण्यापूर्वी त्यांच्या धर्माबाबत विचारले होते. मात्र, गोळीबार करताना दहशतवाद्यांकडे लोकांना त्यांच्या धर्माबाबत विचारण्यासाठी वेळ असतो का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधारी पक्षाच्या इतर नेत्यांनी जोरदार निशाणा साधला. तर काँग्रेसनेही वडेट्टीवारांच्या विधानाशी असहमत असल्याचे सांगितले. हल्ल्यावर वादग्रस्त विधान करणे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या अंगलट आले. पीडितांच्या कुटुंबियांव्यतिरिक्त त्यांनी सरकारच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित ( Wadettiwar Controversial Statement ) केले होते.
या हल्ल्याबाबत असे बेजबाबदार वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेस हायकमांडने वडेट्टीवारांना कडक शब्दांत फटकारले. पहलगाम हल्ल्यावर बोलताना सावधगिरी बाळगा, असे कडक निर्देश काँग्रेस हायकमांडने त्यांच्या नेत्यांना दिले आहेत. हा मुद्दा खूप संवेदनशील आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही नेत्याने अतिउत्साहात असे कोणतेही विधान करू नये, ज्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब होऊ शकते, असेही सुनावले आहे. यानंतर, सर्व बाजूंनी एकाकी पडलेल्या वडेट्टीवारांनी ( Wadettiwar Controversial Statement ) मंगळवारी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असे ते म्हणाले. जर माझ्या विधानामुळे पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल माफी मागतो, असेही ते म्हणाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेसचे सदस्य माध्यमांना संबोधित करत आहेत. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. ही काँग्रेसची भूमिका नाही, असे काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी स्पष्ट केले आहे.
किमान माणुसकी म्हणून तरी आम्ही काय भोगले याचा विचार करा. आमच्या भावनांशी खेळू नका, अशी विनंती पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेले संतोष जगदाळे यांच्या पत्नीने केली आहे. दहशतवाद काय असतो ? हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आणि अनुभवले आहे. ते आम्ही सोसले, दहशतवाद्यांचा द्वेष काय असतो याचा अनुभव आम्ही घेतला आहे. त्यामुळे आम्ही अशा राजकारणासमोर हात जोडतो की त्यांनी यावर राजकारण करू नये, असे खडेबोल राजकारण्यांना सुनावले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्यापूर्वी काँग्रेसने स्वतःचे अधिवेशन बोलावावे. पीडितांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना संसदीय पक्षाचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार ( Wadettiwar Controversial Statement ) यांच्या व्यतिरिक्त, कर्नाटक काँग्रेसचे मंत्री आर. बी. थिम्मापूर आणि स्वतः मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही पीडितांच्या त्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे केवळ वैयक्तिक विधान नाही तर देशविरोधी आवाज आहे. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या विधानावरही त्यांनी टीका केली. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या पाठीशी काँग्रेस उभी आहे की दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांच्या पाठीशी आहे, हे काँग्रेसने स्पष्ट करावे, असेही ते म्हणाले.