CM Nagpur Blackout नागपूर करंटलेस ! मुख्यमंत्री, तुमचं शहर अंधारात का ? नागरिकांचा सवाल

Top Trending News    08-Apr-2025
Total Views |

cm mah
 
नागपूर : ( CM Nagpur Blackout )  कडक उन्हाळा सुरू होताच नागपूरकरांना वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे हे शहर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असूनही, वारंवार होणाऱ्या वीज खंडनामुळे नागरिक ( CM Nagpur Blackout ) हैराण झाले आहेत. दिवसा किंवा रात्री कधीही वीज बंद होते, ज्यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत आहे.
 
थोड्याशा पावसातही वीज खंडित
 
अवकाळी पावसामुळे काही भागांत वीजपुरवठा थांबतो, हे महावितरणच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. जरी कोट्यवधी रुपयांचे पायाभूत सुविधांवरील काम चालू असल्याचे सांगितले जात असले, तरीही उपकेंद्रे व फीडरमध्ये बिघाड होत आहेत. दक्षिण नागपुरात ( CM Nagpur Blackout ) हे प्रभावीपणे दिसून येते. 2 एप्रिल रोजी आलेल्या वादळामुळे शहरातील अनेक भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला. दुपारी 1.30 वाजता आलेल्या वादळामुळे पार्वती नगर, रामेश्वरी, अभयनगर, बेसा, मानेवाडा, रामबाग, महाल, सक्करदरा, जानकीनगर, भगवाननगर, उमरेड रोड, सूतगिरणी, वाठडीनगर, वाड्डीनगर, त्रिमूर्तीनगर, छत्रपतीनगर, सोमलवाडा, मनीषनगर या परिसरांत अंधार पसरला होता.

 
पावसाआधीची तयारी नाही
 
एप्रिल-मे महिन्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस होणे सामान्य आहे, तरीही महावितरणकडून कोणतीही पूर्वतयारी केली जात नाही. झाडांच्या फांद्या वीज तारांवर पडून वीजपुरवठा खंडित ( CM Nagpur Blackout ) होतो. जर वेळेवर छाटणीचे काम झाले असते, तर नुकसान टाळता आले असते. याशिवाय ट्रान्सफॉर्मरच्या देखभाल व दुरुस्तीसंबंधीही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
 
अनंतनगर, गोरेवाडा येथे मोठा वीजपुरवठा खंडित
 
6 एप्रिल रोजी रात्री गिट्टीखान व सदर परिसरात मध्यरात्री वीज गेली. उष्णतेमुळे एसी-कूलर बंद झाल्याने नागरिक त्रस्त झाले. जवळपास 45 मिनिटांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्याच दिवशी दुपारी 12 वाजता अनंतनगर, गोरेवाडा आणि गिट्टीखान परिसरात पुन्हा वीज गेली. महावितरणचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटणकर यांनी सांगितले की, गोरेवाडा रिंग रोडवर पालोती स्कूल जवळ एका टिप्परने कारला धडक दिल्यामुळे इलेक्ट्रिकल रिंग मेन युनिटचे नुकसान झाले. यामुळे गोरेवाडा उपकेंद्राचे दोन 11 केव्ही फीडर बंद झाले. दुपारी 12.30 वाजता पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरू करण्यात आला, मात्र ओव्हरलोडिंगमुळे पुन्हा वीज गेली. अखेर सकाळी 6.30 वाजता इतर फीडरवरून वीज वळवून पुरवठा पूर्ववत करण्यात आला.
 
वारंवार वीज खंडित होणे चिंता वाढवणारे
 
सततच्या वीज खंडनामुळे नागपूरकरांमध्ये नाराजी वाढत आहे. मुख्यमंत्री स्वतः ऊर्जा मंत्रालय सांभाळत असतानाही त्यांच्या गावी अशी स्थिती असणे महत्त्वपूर्ण प्रश्न निर्माण करते. पावसाळ्याआधी नियोजनबद्ध देखभाल आणि यंत्रणेची क्षमता वाढवणे गरजेचे ठरत आहे.