Old Women Missing : 94 वर्षीय आजीने कंटाळून सोडले घर … काय घडलं नेमकं ?

14 May 2025 15:27:48

missig
 
नागपूर : ( Old Women Missing ) आई बेपत्ता असल्याची तक्रार बेलतरोडी ठाण्यात देण्यात आली. त्यांचे वय 94 वर्ष आहे. त्यांना 5 मुली आणि एक मुलगा आहे. आर्थिक स्थितीही उत्तम होती. त्यानंतरही त्यांच्या वाट्याला एकाकीपणा आला. या एकाकीपणाला त्या कंटाळल्या होत्या. वृद्धावस्थेत घरची कामे करणेही कठीण झाले होते. अशात त्यांच्या डोळ्यांत आसवांनी गर्दी केली आणि मनात असंख्य विचार दाटले. मुलांच्या नजरेच्या आड व्हावे, पण कुठे जाणार, त्यांना काहीच कळत नव्हते. आयुष्य अंतिम टप्प्यावर असताना त्यांना एकाकी जीवन जगण्याची वेळ आली. वयोवृद्ध असल्याने स्वत:ची कामे करणे शक्य नाही. आपल्या वाट्याला असे जीवन येईल, असा विचार त्यांनी स्वप्नातही केला ( Old Women Missing ) नसेल. परंतु, नियती त्यांच्याशी क्रूर वागली. काय झाले असेल कुणास ठाऊक, त्यांना घराबाहेर पडावे लागले.
 
रखरखत्या उन्हात मिळेल त्या दिशेने निघाल्या. उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत असताना त्या 2 मे रोजी घरून निघाल्या. जवळ पैसे नसल्याने त्यांनी एका ऑटोरीक्षाचालकाला विनंती केली. त्यालाही दया आली. त्याने पैसे न घेताच त्यांना नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचविले. एक दिवस थांबल्यावर त्या गणेशपेठ बसस्थानकात गेल्या. तिथून शेगावला पोहोचल्या. धार्मिक स्थळ आणि शेगाव रेल्वे स्थानकावर थांबल्यानंतर त्या पुन्हा नागपूर रेल्वे स्थानकावर आल्या ( Old Women Missing ). धड चालताही येत नाही, अशा स्थितीत त्या तब्बल 14 दिवस भटकत राहिल्या. दुसऱ्याच्या दयेवर जगत होत्या. काही दिवस रेल्वे स्थानकावर तर काही दिवस एका धार्मिक स्थळी आभाळाच्या छताखाली राहण्याची वेळ आली. अखेर बेलतरोडी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या कल्पकतेने त्या वृद्ध महिलेचा शोध लागला. आईला सुखरूप पाहून मुलींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांना कधीच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला नाही. मुलांची आर्थिक स्थिती उत्तमच उत्तमच होती.
 
वपोनि मुकुंद कवाडे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांच्या शोधासाठी एक पथक तयार ( Old Women Missing ) केले. पथकात उपनिरीक्षक राणी गोडसे, कविता जांभूळकर, दिलीप कश्यप यांचा समावेश होता. दरम्यान कवाडे यांनी वृद्ध महिलेच्या छायाचित्रासह पत्रक छापले. त्यावर मोबाईल नंबर लिहिला. ते पत्रक ऑटोरिक्षा, बस आणि रेल्वे स्थानकावर लावले. यासोबतच सीसीटीव्ही फुटेज, पोलिस खबऱ्यांनाही कामी लावले. दरम्यान पोलिसांना एक फोन आला. पोलिस पथक नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले. वृद्ध महिलेला ताब्यात घेऊन कुटुंबाच्या स्वाधीन केले. पोलिस उपायुक्त रश्मिता राव, एसीपी नरेंद्र हिवरे, वपोनि मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनामुळे महिला सुखरूप सापडली.
 
 
Powered By Sangraha 9.0