सिंगापूर : ( COVID Resurgence ) संपूर्ण जगाला हादरविणारा कोरानाचा नवा व्हेरियंट आशियातील अनेक देशांमध्ये पुन्हा वेगाने पसरत आहे. मे महिन्याच्या सुरवातीलाच सिंगापूरमध्ये 14 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. भारतातही 94 रुग्ण नोंदले गेले आहेत. नव्या संसर्गामुळे चीन, हाँगकाँगसह अनेक देश सतर्क झाले आहेत. यावेळी ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट जेएन 1 आणि त्याचे उपप्रकार जेएफ 7 आणि एनबी 1.8 मुळे संसर्ग झाल्याचे दिसते.
सिंगापूरमध्ये सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली आहे. दररोज रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या 30 टक्क्यांनी वाढते आहे. ताज्या रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे नाहीत. एप्रिलच्या शेवटी 11 हजार असलेली रुग्णांची संख्या मे महिन्याच्या सुरुवातीलाच 28 टक्क्यांनी वाढून 14 हजारांवर गेली आहे. या पूर्वीच्या कोरोनापेक्षा घातक असल्याचे एकही उदाहरण आढळून आलेले नाही, असे आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे. त्यामुळे खूप घाबरण्याचे कारण नाही परंतु, पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. कारण, कमकुवत प्रतिकारशक्ती ही कोरोनाची तीव्रता ( COVID Resurgence ) वाढवते.
जेएन 1 हा ओमिक्रॉनच्या बीए 2.86 चा एक प्रकार आहे. यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये तो आढळला होता. त्यात सुमारे 30 उत्परिवर्तन झाले आहेत. नवा व्हेरियंट हा प्रतिकारशक्ती झपाट्याने कमी करतो. त्यामुळे तो वेगाने पसरतो. मात्र, तो अतिशय गंभीर प्रकारात मोडत नाही. जगाच्या अनेक भागांत हा सर्वसामान्य प्रकार आहे. जेएन 1 ची लक्षणे ही वेगवेगळी आढळतात. दीर्घकाळ लक्षणे राहिल्यास गंभीरता वाढू शकते. तथापि, सध्याच्या लसी किंवा त्यामुळे शरीरात निर्माण झालेल्या अॅन्टीबॉडिज त्याविरुद्ध कमी प्रभावी आहेत. परंतु एक्सबीबी.1.5 मोनोव्हॅलेंट बूस्टर डोस ही जेएन 1 शी लढण्यात मदत ( COVID Resurgence ) करते.
भारतात केवळ 93 प्रकरणे
मे महिन्यात आतापर्यंत भारतात केवळ 93 प्रकरणे समोर आली आहेत. मुंबईत मृत्यू झालेल्या दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परंतु, त्यांचा मृत्यू कोरोनामुळेच झाला हे सांगणे कठीण आहे. सध्या भारतात कोरोनाची कोणतीही मोठी लाट आलेली नाही, असे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. मात्र, आशियाई देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा झपाट्याने प्रसार होत असल्याने आपण आवश्यक व योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. लसीकरणाचा सल्लाही ( COVID Resurgence ) देण्यात आला आहे.