Bhujbal Pattern : भुजबळांचा 'पॅटर्न' चर्चेत, मंत्रीपदाच्या उंबरठ्यावर नवा डाव ?

21 May 2025 20:02:42

pattern
 
मुंबई - ( Bhujbal Pattern ) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि येवला मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांनी अखेर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात पुनरागमन केले आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात भुजबळ यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याचे समजते. मंत्रिपद मिळाल्याबद्दल भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले. भुजबळ हे अजित पवार गटातील एक मोठा ओबीसी चेहरा मानले जातात.
 
मागील वर्षी डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळ यांना स्थान न मिळाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यामुळे भुजबळ समर्थकांमध्येही असंतोष पसरला होता, विशेषत: जालना येथे समर्थकांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला होता. तसेच, भुजबळांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी लढा उभारला असल्याने त्यांना मंत्रिमंडळातून डावलल्याने राज्यभरातील ओबीसी समाजात नाराजी होती. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी भुजबळ यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले होते. अखेर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांची वर्णी लागली आहे. धनंजय मुंडे यांच्या जागी आता भुजबळ मंत्री ( Bhujbal Pattern ) होणार असल्याने पक्षातील इतर इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले आहे.
 
कोणतीही जबाबदारी स्विकारण्यास तयार
 
कॅबिनेट मंत्रींपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ ( Bhujbal Pattern ) यांनी प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, मी कोणत्याही खात्याची अपेक्षा ठेवलेली नाही. सरकार जी जबाबदारी देईल, ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मी मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन. दुसरीकडे मात्र छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे संतापले आहेत. जातीवादी लोकांना पोसण्याचे काम अजित पवार का करत आहेत हे कळत नाही. अजित पवारांना याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. मराठा आरक्षणाचे मारेकरी अजित पवार मंत्रिपदी घेत असतील तर यापुढे मराठ्यांनाही एकजूट व्हावे लागेल अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी भुजबळांना ( Bhujbal Pattern ) मंत्रिमंडळात घेतल्यानंतर दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0