Online Property Tax Nagpur : देख रहा है ना…बिनोद... म्हणत, नागपूर मनपाचे ‘मीम्स’ बघितले का ?

25 May 2025 15:20:12
 
mims
 
 
नागपूर : ( Online Property Tax Nagpur ) मालमत्ता कर ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी मालमत्ताधारकांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेने एक अभिनव मार्ग निवडला असून, पारंपरिक जाहिरातींच्या पलीकडे जाऊन, सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या 'मीम्स' चा वापर सुरू केला आहे. नागरिकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणत त्यांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न मनपाद्वारे करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात अधिकाधिक नागरिकांना मनपाच्या सेवांचा लाभ घेता यावा याकरिता सोशल मीडियाचा देखील वापर केला जात आहे. तसेच नागरिकांना मालमत्ता कर विभागाद्वारे विशेष सवलत देण्यात येत आहे. मनपाने सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या विविध मीम्सचा खुबीने वापर सुरू केला आहे. या मीम्स मधून नागरिकांना आपला मालमत्ता कर ( Online Property Tax Nagpur ) लवकरात लवकर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
विशेषतः आजच आपला मालमत्ता कर ( Online Property Tax Nagpur ) ऑनलाईन पद्धतीने nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर किंवा जवळच्या झोन कार्यालयात जाऊन भरा आणि ऑनलाईन कर अदा केल्यास 15 टक्के सवलत मिळवा, हा संदेश या मीम्सद्वारे प्रभावीपणे पोहोचवला जात आहे. यात सध्या ट्रेंडिंग असलेल्या विशाल मेगा मार्ट वरील मीम्सचा वापर करण्यात आला आहे. मनपा क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मालमत्ता कराची चालू वर्षाची पूर्ण रक्कम एकमुस्त ऑनलाईन माध्यमातून मनपा निधीत जमा करणाऱ्या मालमत्ता धारकास कर रक्कमेत 15 टक्के सूट दिली जाणार आहे. याशिवाय ऑफलाईन माध्यमातून कर भरणाऱ्या मालमत्ता धारकास 10 टक्के सूट देण्यात येणार आहे. मनपाच्या या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा व ऑनलाईन पेमेंट सुविधेचा देखील वापर जास्तीत जास्त नागरिकांनी करावा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी ( Online Property Tax Nagpur ) यांनी केले आहे.
 
अशी आहे जाहिरात
 
याशिवाय सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या धनंजय माने इथेच राहतात का ? यावर मिम्स तयार करून 'धनंजय माने इथेच राहतात का ?...हो इथेच राहतात आणि त्यांनी घरचा टॅक्स ऑनलाईन १५ टक्के सवलत घेऊन भरला आहे. तुम्ही पण भरा, यामीमद्वारे कर भरणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. जेव्हा नागपूरचा खरा हिरो शहरासाठी कर भरतो, देख रहा है ना बिनोद..." या मीममधून कर भरणारे नागरिक हेच खरे हिरो असल्याचे दर्शवून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मनपाने ( Online Property Tax Nagpur ) तयार केलेले हे सर्व मीम्स सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. नागरिक या मीम्सना प्रचंड प्रतिसाद देत असून, या अनोख्या उपक्रमामुळे कर भरण्या विषयीची उदासीनता कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. या प्रयत्नामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.
 
एक व्हिडिओ सीरिज
 
मनपात ऑनलाईन पद्धतीने कर भरणाऱ्या नागरिकांना आलेला सुखद अनुभव इतरांनाही प्रेरित करावा, याकरिता मनपाच्या सोशल मीडिया वर #होय_मी_जबाबदार_नागरिक या हॅशटॅग अंतर्गत व्हिडिओ सीरिज चालविल्या जात आहे. मी नेहमी ऑनलाईन पद्धतीने कर भरणा करीत असतो, त्यामुळे वेळेची बचत होते आणि कुठेही न जात घर बसल्या या सुविधेचा लाभ घेता येतो. असा सुखद अनुभव ज्येष्ठ नागरिक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी सांगितला.
Powered By Sangraha 9.0