Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळा ! पूर्ण पगारासाठी लाखोंची मागणी, तक्रारीवरून थेट अटक

25 May 2025 22:26:30

sc
 
नागपूर : ( Shalarth ID Scam )  शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. वर्धेच्या या प्रकरणात शिक्षिकेने जामदारविरुद्ध तक्रार केली आहे. लाखोंच्या मागणीचा प्रकार या प्रकरणात उघडकीस आला आहे. वर्धेच्या एका शिक्षिकेने रविवारी एसआयटीकडे तक्रार केला आहे. या तक्रारीमुळे अनेकांवर अटकेची टांगती तलवार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही तात्कालिन अधिकारीही रडारवर असून त्यांच्या घराची झडतीही घेण्यात येत आहे. सोमवारी या प्रकरणात आणखी काही जणांना अटकेची शक्यता आहे.
 
तक्रारकर्त्या अंशुल कोल्हे ह्या वर्धा येथील बजाज सायंस कॉलेज येथे शिक्षिका ( Shalarth ID Scam ) आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, दोन शिक्षिकांचे अप्रुव्हल 50 टक्के होते. मात्र, त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ दिल्याने त्यांना पूर्ण पगार मिळायचा. परंतु, कोल्हे यांना अर्धाच पगार मिळत होता. शिवाय त्यांना शालार्थ आयडी सुद्धा मिळाली नव्हती. अनेक प्रयत्नानंतर त्यांना शालार्थ आयडी देण्यात आली. पूर्ण पगारासाठी त्यांना 5 लाखांची मागणी करण्यात आली. रक्कम न दिल्याने त्यांची शालार्थ आयडी रद्द करून निलंबित करण्यात आले.
 
दोन शिक्षिकांचे अप्रुव्हल (मान्यता) 50 टक्के असतानाही त्यांनी आर्थिक सहकार्य केले म्हणून पूर्ण पगार दिला जायचा. मात्र, मला अर्धाच पगार मिळायचा. पूर्ण पगार पाहिजे असल्यास 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केली आहे. जामदार यांच्या कार्यकाळात हा प्रकार घडल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तर, सरस्वती हायस्कूल, बोखारा येथील रश्मी जवंजाळ या शिक्षिकेने संस्था चालकाविरुद्ध तक्रार दिली आहे. शाळा 40 टक्के अनुदानित असतानाही त्यांचा अप्रुव्हल विनाअनुदानित शाळेचा काढण्यात आले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
 
बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी ( Shalarth ID Scam ) माजी शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार हिच्या अटकेनंतर धक्कादायक खुलासे होत आहेत. वैशालीला सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस चौकशीला ती सहकार्य करीत नसल्याची बाब पुढे आली आहे. मी काहीच केले नाही. यात माझा कुठल्याही प्रकारे सहभाग नाही. तांत्रिक कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे, एवढेच ती पोलिसांना सांगते. आणखी काही तास ती पोलिस कोठडीत आहे. सोमवारी तिला न्यायालयात हजर केले जाईल. पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाहिजे तशी माहिती तिच्याकडून मिळालेली नाही. त्यामुळे न्यायालयाकडे तिच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात येईल.
 
शिक्षण विभाग हादरला
 
राज्य शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष चिंतामण वंजारी याला गुरूवारी अटक करण्यात आली. त्याला 27 मे पर्यंत पोलिस कोठडी आहे. जामदार आणि वंजारी या दोघांच्या अटकेमुळे शिक्षण विभाग चांगलाच हादरला आहे. कोठडी दरम्यान त्यांच्या कडून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. माजी विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष अनिल पारधी, चिंतामण वंजारी, उल्हास नरड यांच्यासह आता वैशाली जामदार हिला अटक करण्यात आली आहे. यानंतर सेवानिवृत्त उपसंचालकांवर अटकेची टांगती तलवार ( Shalarth ID Scam ) आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0