नागपूर : ( Shalarth ID Scam ) बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्या प्रकरणी माजी शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले. पोलिसांनी 5 दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर 3 दिवसांची म्हणजे सोमवार 26 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणात 2019 ते 2025 पर्यंत तयार करण्यात आलेल्या शालार्थ आयडीचा तपास करण्यात येत आहे. शालेय शिक्षण विभागाच्या अधिकारी माधुरी सावरकर यांच्या नेतृत्वात एक समिती नेमण्यात आली होती. या समितीत चिंतामण वंजारी ( Shalarth ID Scam ) याचा समावेश होता.
दरम्यान राज्य शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष चिंतामण वंजारीला गुरूवारी अटक करण्यात आली. वंजारील 27 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. जामदार आणि वंजारी या दोघांच्या अटकेमुळे शिक्षण विभाग हादरला आहे. कोठडी दरम्यान त्यांच्याकडून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्यांना धडकी भरली आहे. तर, अनेकांवर अटकेची टांगती तलवार लटकली ( Shalarth ID Scam ) आहे.
बोगस शालार्थ आयडी प्रकरणात म्होरक्या समजला जाणारा लक्ष्मण उपासराव मंघाम (47) रा. दाभा याला सदर पोलिसांनी अटक केली होती. लक्ष्मण आधी शिक्षण उपसंचालक कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होता. 2023 मध्ये त्याची मनपाच्या शिक्षण विभागात बदली करण्यात आली. यानंतरही तो शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संपर्कात होता, या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याची जामीनावर सुटका केली. त्याच्या माहितीवरूनच चिंतामण वंजारीला अटक ( Shalarth ID Scam ) करण्यात आली.
या प्रकरणाचा तपास सदर पोलिस करीत असतानाच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी दीड महिन्यापूर्वीच वैशाली जामदारला सूचनापत्र देवून चौकशीसाठी बोलाविले होते. मात्र, परिक्षा सुरू असल्यामुळे तिने असमर्थता दर्शविली होती. परीक्षा आटोपल्यानंतर चौकशी समितीसमोर येण्याची हमी दिली होती. आता सायबर प्रकरणात सायबर पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. ट्रान्झिट रिमांडवर तिला शनिवारी नागपुरात आणले. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जामदार विरोधात वर्धेतील एक शिक्षिका रविवारी तक्रार देण्यासाठी येणार आहे. त्यानंतर आणखी तक्रारदार पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वैशाली जामदार 2021 मध्ये उपसंचालक
2019 पासून बोगस आयडी जारी झाल्याची बाब पोलिस तपासात समोर आली. वैशाली जामदार 2021 मध्ये नागपुरात उपसंचालक होती. जामदारच्या कार्यकाळात देखील बोगस आयडी तयार झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिस कोठडी दरम्यान पोलिस सखोल चौकशी करतीलच शिवाय तिच्याकडून माहिती मिळाल्यावर काही लोकांना अटकही केली जाईल. माजी विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष अनिल पारधी, चिंतामण वंजारी, उल्हास नरड यांच्यासह आता वैशाली जामदार हिला अटक करण्यात आली आहे. यानंतर सेवानिवृत्त उपसंचालकांवर अटकेची टांगती तलवार आहे. ज्यांचा एकेकाळी प्रचंड बोलबाला होता.