नागपूर : ( Pending Salary Engineers ) जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागात पदभरतीचा गोंधळ बराच होता. अनेक वर्षांपासून कनिष्ठ अभियंत्यांची पदे रिक्त असल्याने बरीच कामे रखडली गेली होती. डिसेंबर 2024 पर्यंत या विभागात कनिष्ठ अभियंत्यांची पदे रिक्त होती. शासनाने कशीबशी ही पदे भरली आणि 13 नवीन अभियंते रुजू झाले आहेत. परंतु, आता त्यांच्या वेतनाचा प्रश्न उभा ठाकला आहे.
लेखाशिर्षाचाच गोंधळ
जिल्हा परिषदेचा लघुसिंचन विभागाचा कारभार आधीच प्रभारीवर आहे. मात्र, त्यांच्या वेतनासाठी आवश्यक असलेला लेखाशीर्षच तयार करण्यात आले नाही. नव्याने रुजू झालेल्या 13 कनिष्ठ अभियंत्यांना मागील पाच महिन्यांपासून वेतन सुरु झाले ( Pending Salary Engineers ) नाही. 'लेखाशीर्ष' तयार न झाल्याने पगाराचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे, जानेवारी महिन्यापासून त्यांना वेतन मिळालेले नाही, परिणामी त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
कनिष्ठ अभियंते उपविभागांतर्गत विकासकामांना भेटी देतात त्याची पाहणी करतात आणि लघुसिंचन अधिकाऱ्यांना अहवाल सादर करतात. परंतु, विभागात पूर्णवेळ अधिकारी नसल्याने त्यांचे म्हणणे ऐकून घेणारे कुणीच नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. यात काही महिला कनिष्ठ अभियंत्यांचाही समावेश आहे. जलसंधारण आयुक्तालयाने त्यांची पदस्थापना केली असल्याने जिल्हा परिषद प्रशासनही यात काही हस्तक्षेप करण्यास असमर्थ आहे. कनिष्ठ अभियंत्यांच्या रुजू झाल्यानंतर त्यांच्या आस्थापनेचा आकृतिबंध आणि वेतनाचा लेखाशीर्ष कोणता असावा, याबाबत स्पष्ट आदेश काढणे आवश्यक होते. ते आदेश काढले गेले नसल्यानेच त्यांचा वेतन लेखाशीर्ष तयार झालेला नाही. काम करूनही वेतन मिळत नसल्याने आणि तक्रार ऐकून घेण्यासाठी कोणीही अधिकारी उपलब्ध नसल्याने या अभियंत्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला ( Pending Salary Engineers ) आहे.
आगामी पावसाळा तोंडावर आहे. कोल्हापुरी बंधारे, मामा तलाव, पाझर तलाव यांची पावसाळापूर्व कामे, तसेच 'गाळमुक्त तलाव' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची कामे अद्याप व्हायची आहेत. काही कामांच्या निविदाही प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत कनिष्ठ अभियंत्यांच्या वेतनाचा प्रश्न समोर आल्याने कामांवरही परिणाम होण्याची भीती ( Pending Salary Engineers ) आहे.