नागपूर : ( Recruitment Scam ) शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास कसून सुरु असून सध्या पोलिसांच्या रडारवर शिक्षण संस्था संचालक आहेत. राज्यभर गाजत असलेल्या या शालार्थ आयडी घोटाळ्यात सायबर पोलिसांनी शिक्षण उपसंचालक दर्जाच्या पाच अधिकाऱ्यांना अटक केली आहे. आता शिक्षकांच्या मान्यतेचे बनावट प्रस्ताव सादर करून शाळेत शिक्षक भरती करणाऱ्या संस्थाचालकांवरही कारवाई होणार आहे. अनेक संस्थाचालकांविरोधात विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) तक्रारी आल्या असून, त्यांचाही तपास ( Recruitment Scam ) केला जाणार आहे.
ज्या संस्थाचालकांनी स्वतःच्या कुटुंबातील अनेकांना पात्रता नसतानाही शिक्षक व कर्मचारी पदावर नोकरीवर लावून घेतले आणि शासनाची फसवणूक केली. संचालकांनी आपल्या आप्तस्वकीयांचा वेतन काढून शासनाची फसवणूक केली आहे. या सर्व प्रकारामुळे पात्र शिक्षकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे आता संस्था संचालकांवर अटकेची टांगती तलवार ( Recruitment Scam ) आहे.
शिक्षकांचा पैशांसाठी छळ
महत्वाची बाब म्हणजे काही शिक्षकांचा पैशांसाठी छळ सुरू आहे. तर काही शिक्षकांच्या वेतन रोखण्यात तक्रारीही आल्या आहेत. शालार्थ आयडी घोटाळ्याचा 'एसआयटी'कडून कसून तपास सुरू असून अटकेत असलेले चिंतामण वंजारी, वैशाली जामदार, आणि लक्ष्मण मंघाम यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तपास समितीच्या रडारवर काही संस्थाचालक असून, लवकरच त्यांना ताब्यात घेऊन अटकेची कारवाई करण्यात येणार आहे.
आर्थिक गैरव्यवहाराचे गणित
शिक्षण संस्थाचालक, शिक्षण उपसंचालक आणि वेतन अधीक्षकांच्या संगनमताने लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार गैरमार्गाने करून घोटाळा करण्यात आला आहे. संस्थाचालकांनीही यात अनेक आर्थिक गैरप्रकार आणि गैरव्यवहार केले आहे. या घोटाळ्यात १०५६ नियुक्त शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली होती. २०१९ ते २०२५ पर्यंत गैरमार्गाने 'शालार्थ आयडी' तयार करून शासनाचे कोट्यवधी रुपये लाटण्यात आले. संस्थाचालकांविरोधात 'एसआयटी' कडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, आता संस्थाचालकांवर कारवाई होणार आहे. अनेक शाळांमध्ये संस्थांचालकांचे नातेवाईक नोकरीला आहेत. तसेच, वरिष्ठ शिक्षकांना डावलून नातेवाईकांना पदोन्नती दिली गेली आहे. संस्था चालकांनी त्यांना असलेल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे.