Mitra For Growth : ‘मित्र’ व ‘महास्ट्राइड’च्या जोरावर अर्थक्रांती ? फडणवीसांचं 35 लाख कोटींचं मिशन सुरू

29 Jun 2025 10:57:39

mitra
 
नागपूर : ( Mitra For Growth ) मिहान येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या अर्थात आयआयएम सभागृहात महा स्ट्राइड प्रकल्पाचा प्रातिनिधिक शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. ज्याचा प्रतिनिधिक शुभारंभ केला तो महास्ट्राइड हा उपक्रम राज्याच्या विकासाला दिशा देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शासन ही एक संस्था असून संस्था म्हणून याची क्षमता आणि संस्थात्मक बांधणी योग्य रीतीने झाली तरच आपणास मोठे परिवर्तन साध्य करू शकू. या दृष्टीने आता आपण 100 दिवस प्रशासकीय सुधारणा उपक्रम, त्यापाठोपाठ 150 दिवस उपक्रम हाती घेतले.
 
संस्थात्मक विकास कामांचे नियोजन ही प्रदीर्घ काळ चालणारी निरंतर प्रक्रिया असते, तो पाया असतो. सरकारकडे जेव्हा संस्था किंवा इन्स्टिट्युशन म्हणून पाहतो तेव्हा विकासाचे दीर्घकाल केलेले नियोजन असते. या अंमलबजावणी यंत्रणेतील माणसे बदलली तरी त्याची गती ही स्वयंचलित पद्धतीने पुढे सरकने आवश्यक असते. यातूनच दीर्घ नियोजनाला अर्थ उरेल व विकासाचे उद्दिष्ट आपण आपले ध्येय साध्य करू शकू. या दृष्टीने विचार करून आपण महा स्ट्राईड प्रकल्पाचा शुभारंभ केला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Mitra For Growth ) यांनी सांगितले.
 
महाराष्ट्राच्या निर्मितीपासून 2013 - 14 पर्यंत आपला जो जीएसडीपी होता तो 15 लाख कोटी पर्यंत पोहोचला. 2013 - 14 पासून ते 2019 - 20 पर्यंत तो 29 लाख कोटी पर्यंत पोहोचला. गेल्या पाच वर्षाचा विचार करता तो 45 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. या विकासाकडे आपण अभ्यासपूर्ण दृष्टीने जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की गत दहा वर्षात आपण 30 लाख कोटी रुपयांची वाढ साध्य केली आहे. याचा अर्थ महाराष्ट्राकडे विकासाची प्रचंड क्षमता असल्याचे ( Mitra For Growth ) स्पष्ट होते.
 
विकासाच्या या टप्प्यामध्ये अजून एक महत्वपूर्ण बाबा म्हणजे या एकूण 45 लाख कोटी जीएसडीपी मध्ये केवळ सात जिल्हे 50 टक्क्यांपर्यंत जीएसडीपी तयार करतात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2047 पर्यंत विकसित भारताचे तसेच राज्याचे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे स्वप्न पूर्ण करायचे असल्यास राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे विकासाच्या प्रक्रियेत योगदान गरजेचे आहे. राज्याच्या जीएसडीपीच्या वाढीमध्ये आपण कुठे आहोत हे जिल्हाधिकाऱ्यांनी पाहून आपल्या जिल्ह्याचे काय योगदान राहील याचा विचारपूर्वक योजना आखल्या पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Mitra For Growth ) म्हणाले.
आपल्याजवळ निधीची कमतरता नाही तर गरज आहे सुयोग्य डाटावर आधारित नियोजनाची. ज्या योजना परिपूर्ण आहेत त्या योजनांवर खर्च होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाची भूमिका ही सहकार्याची, शक्ती देण्याची आहे. हाच विश्वास खाजगी क्षेत्राला प्रशासनाकडून मिळायला हवा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्याच्या प्रशासनात उत्तम क्षमता आहे, त्या क्षमतेला ओळखून सर्व जिल्हाधिकारी न्याय देतील हा प्रकल्प यशस्वी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
‘मित्र’ बनणार नव्या महाराष्ट्राचा शिल्पकार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
 
मित्र ही संस्था महाराष्ट्राला विकासाकडे नेणारा एक मोठा विकास रथ होऊ शकते. प्रयत्न केला तर ही चळवळ होऊ शकते. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात सिंहाचा वाटा महाराष्ट्राला उचलायचा आहे. तर मित्रच्या माध्यमातून महाराष्ट्राची उभारणी होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
 
विकासामध्ये सर्वसमावेशकता असली पाहिजे. जिल्हा आणि तालुके हे विकासाची केंद्र होण्याची गरज असून सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून प्रशासनाला यातून अधिक गतिमान होण्यास मदत होईल. मित्रच्या माध्यमातून मागास जिल्ह्यांचा विकास होण्यास मदत होणार असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

विभागनिहाय जिल्हाधिकाऱ्यांचे सादरीकरण
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर राज्याच्या सहा विभागातील प्रत्येकी एका जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. यात नागपूर विभागातून गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पांडा, अमरावती विभागातून वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस., संभाजीनगर विभातून धाराशिव जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, नाशिक विभागातून जळगांवचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कोकण विभागातून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पुणे विभागातून कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यांचे  ( Mitra For Growth ) सादरीकरण केले.
 
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मित्राचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, उपाध्यक्ष राणा जगजीत सिंग पाटील, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मा. मंत्री मुख्यमंत्री महोदयांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रविणसिंह परदेशी, अपर मुख्य सचिव राजेश कुमार मीना, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, जागतिक बँकेचे मारचीन पियाट्‌कॉस्की आदी मान्यवर उपस्थित  ( Mitra For Growth ) होते.
 
 
Powered By Sangraha 9.0