Mahal Riot Twist : 80 आरोपींना जामीन, फक्त फहीम खान गजाआड का ? महाल हिंसाचारातील नवा ट्विस्ट

Top Trending News    30-Jun-2025
Total Views |

mahal
 
नागपूर : ( Mahal Riot Twist ) औरंगजेबाच्या कबरीवरून महाल परिसरात 17 मार्च रोजी उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी शेकडो लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. यात 100 हून अधिक आरोपींना अटक केली गेली. चार दिवसांपूर्वीच यातील 9 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून जामीन मिळाला होता. आता उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधारावर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. कुळकर्णी यांनी एकाच वेळी 80 आरोपींचा जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायालयातून दिलासा न मिळाल्याने मोहम्मद राहिल जाकीर खानसह 8 आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केली होती. या सर्वांना गत शुक्रवारी उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. त्यानंतर मोहम्मद हारिश मोहम्मद इस्माईल, मोहम्मद शाहनवाज शेख, मोहम्मद युसूफ शेख, नसीम सलीम शेख आणि इतर 76 आरोपींनी त्यांच्या वकिलांमार्फत सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. फहीम खानसह अनेक आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल ( Mahal Riot Twist ) आहेत.
 
बचावपक्षाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, पोलिसांनी कोणताही सबळ पुरावा नसताना देखील त्यांना अटक केली. केवळ गोपनिय माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. याचिकाकर्ता, मुख्य आरोपी फहीम खानच्या सनी यूथ फोर्स व्हॉट्सअॅप ग्रूपचे सदस्यही नव्हते. ओळख परेडमध्येही त्यांची ओळख पटली नाही. त्यामुळे, त्यांना जामीन मिळाला पाहिजे. या प्रकरणात इतर आरोपींना उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांनाही जामीन मिळण्याचा अधिकार आहे. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सोमवारी 80 आरोपींना सशर्त जामीनावर सोडण्याचे ( Mahal Riot Twist ) आदेश दिले.
 
सर्व आरोपींना 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना आठवड्यातून दोनदा पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागेल. आरोपी कोणत्याही प्रकारे तपास प्रभावित करणार नाहीत आणि तपासात पूर्ण सहकार्य करतील. एकाच वेळी वेगवेगळ्या याचिकांवर जामीन मंजूर झाल्याच्या आदेशाची प्रत उपलब्ध होऊ शकली नाही. एकाच वेळी इतक्या आरोपींना एकाच प्रकरणात जामीन मिळण्याचे हे पहिलेच प्रकरण असल्याची चर्चा सर्वत्र ( Mahal Riot Twist ) सुरु होती.
 
मात्र, या हिंसाचारामागील कथित मास्टरमाईंड मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान याला यावेळीही दिलासा मिळाला नाही. आरोपी फहीम खानच्या जामीनावर 4 जुलै रोजी सुनावणी होणे अपेक्षित आहे. बचाव पक्षातर्फे अॅड. आसिफ कुरेशी, रफीक अकबानी, अश्विन इंगोले, रमेश रावलानी, अतुल रावलानी आदींनी बाजू मांडली, तर जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी सरकारची बाजू मांडली.