Neeraj Chopra Classic : या तारखेला होणार नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धा ! जगातील १२ मोठे खेळाडू सहभागी

04 Jun 2025 18:20:28

niraj
 
बंगळुरू : ( Neeraj Chopra Classic ) भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यापूर्वी ही स्पर्धा 24 मे रोजी होणार होती. परंतु, भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षामुळे मागील महिन्यात असलेली ही स्पर्धा ढकलण्यात आलेली आहे. ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकणारे चोप्रा जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करत आहेत. त्याला अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (एएफआय) ने मान्यता दिली आहे. श्री कांतीरवा स्टेडियमवर होणाऱ्या या स्पर्धेत 12 खेळाडू सहभागी होतील. यामध्ये जगातील सात सर्वोत्तम भालाफेकपटू आणि चोप्रासह पाच भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. नीरज चोप्रा क्लासिक आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धा आता 5 जुलै रोजी होणार आहे. आयोजकांनी मंगळवारी याची घोषणा ( Neeraj Chopra Classic ) केली.
 
नीरज चोप्रा ( Neeraj Chopra Classic ) व्यतिरिक्त, या स्पर्धेत सहभागी होणारे इतर भारतीय खेळाडू म्हणजे आशियाई अजिंक्यपद रौप्यपदक विजेते सचिन यादव, किशोर जेना, रोहित यादव आणि साहिल सिलवाल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या परदेशी खेळाडूंमध्ये दोन वेळा विश्वविजेता ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स (वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 93.07 मीटर), 2016 ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता जर्मनीचा थॉमस रोहलर (93.90 मीटर), 2015 चा विश्वविजेता केनियाचा ज्युलियस येगो (92.72 मीटर), अमेरिकेचा कर्टिस थॉम्पसन (87.76 मीटर), आशियाई खेळांचा कांस्यपदक विजेता जपानचा गेन्की डीन (84.28 मीटर), श्रीलंकेचा रुमेश पाथिरेज (85.45 मीटर) आणि ब्राझीलचा लुईझ मॉरिसियो दा सिल्वा (86.34 मीटर) यांचा समावेश आहे.
 
जागतिक अॅथलेटिक्सकडून श्रेणी अ दर्जा असलेली ही स्पर्धा यापूर्वी पंचकुला येथे होणार होती. परंतु, थेट प्रक्षेपणासाठी पुरेशी प्रकाशयोजना नसल्याने त्याचे यजमानपद बंगळुरूला देण्यात आले. जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सचे मुख्य व्यावसायिक अधिकारी करण यादव म्हणाले, नीरज चोप्रा क्लासिक पुन्हा आयोजित करण्यासाठी मोठ्या सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता होती. आम्हाला 5 जुलै रोजी त्याचे आयोजन निश्चित करताना आनंद होत आहे. या स्पर्धेसाठी तिकिटांची किंमत 199 रुपयांपासून ते 9,999 रुपयांपर्यंत असेल. याशिवाय, 15 जणांसाठी पाच कॉर्पोरेट बॉक्स 44,999 रुपयांना उपलब्ध आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0