Honey Trap Scandal : ‘हनी ट्रॅप’मध्ये सत्ताधीश अडकले ? नाशिकमध्ये फुटला गुप्त डेटाचा बॉम्ब

15 Jul 2025 23:05:39

honey
 
मुंबई : ( Honey Trap Scandal ) राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना हनी ट्रॅपचे प्रकरण उघड झाले आहे. मंगळवारी विधानभवन परिसरात सुद्धा या प्रकरणाची कुजबूज होती. या हनी ट्रॅपमध्ये कोणते नेते आणि अधिकारी आहेत हे जाणून घेण्याची सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. परंतु, या प्रकरणात कोणीही उघडपणे बोलण्यास तयार नाही. या प्रकरणात वैयक्तिक संबंधांचाच संबंध आहे की यामागे मोठे षड्यंत्र आहे याचा शोध सुरू आहे. सूत्रांकडून, हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकलेल्या अधिकारी आणि नेत्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यामुळे सध्या हे प्रकरण गुप्त ठेवण्यात आले आहे. यात नाशिक, मुंबई आणि पुण्यातील वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.
 
नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्यासह राज्यातील 72 वरिष्ठ अधिकारी तसेच काही विद्यमान आणि माजी मंत्री 'हनी ट्रॅप'च्या ( Honey Trap Scandal ) जाळ्यात अडकले आहेत. असा खळबळजनक आरोप नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज्यातील एका बड्या नेत्याने अनौपचारिक संभाषणावेळी केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात  एका महिलेने या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.
 
ठाणे गुन्हे शाखेला तीन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पोलिस त्यांची गुप्तपणे चौकशी करत आहेत. नाशिकचा एक अधिकारी, नवी मुंबईतील एक व्यक्ती आणि ठाण्यातील प्रतिष्ठित नागरिकाने या तक्रारी केल्याचे समजते ( Honey Trap Scandal ). प्रकरणात उच्चस्तरीय गोपनीय तपास सुरू आहे. तपासादरम्यान तक्रारदारांनी त्यांची ओळख उघड न करण्याची विनंती केल्याने अधिकाऱ्यांची नावे गुप्त ठेवण्यात येत आहेत. तथापि, या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0