नागपूर : ( Underage Marriage ) दोघेही जवळ जवळ राहत असल्याने त्यांची ओळख झाली आणि लगेचच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रिया आणि सुजय (काल्पनिक नाव) अशी त्यांची नावे आहेत. प्रिया केवळ 17 वर्षांची तर सुजय 19 वर्षांचा आहे. प्रिया अल्पवयीन असल्याने सहज त्याच्याकडे ओढल्या गेली. त्यांच्या मैत्रीला केवळ तीसच दिवस झाले होते. एका महिन्यातच तिने त्याच्यासोबत आयुष्यभराच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला. मात्र, लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला बेड्या घातल्या. अपहरणाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
प्रिया मुळची मध्यप्रदेशातील रहिवासी असून कामाच्या शोधात तिचे कुटुंब वर्षभरापूर्वीच नागपुरात आले. वाडी ठाण्यांतर्गत विटा भट्टीवर ते काम करतात. सुजय सुद्धा मध्यप्रदेशातील आहे. नागपुरात येऊन त्याला फक्त एक महिनाच झाला होता. प्रियाचे आई-वडील आणि सुजय एकाच वीटा भट्टीवर काम करायचे, त्यामुळे त्यांचे एकमेकांशी जुळण्यास फार वेळ लागला नाही.
दररोज त्यांच्या नजरा एकमेकांशी सतत भीडत होत्या सुजय तरुण तर प्रिया तारूण्याच्या उंबरठ्यावर होती. दोघेही एकमेकांकडे आकर्षित होत गेले. त्यांच्या वरचेवर भेटी होऊ लागल्या आणि ते एकमेकांच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले गेले. त्यांनी पळून जाऊन एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 5 जुलैला दुपारी 3 वाजताच्या सुमारास दोघेही रेल्वेस्थानकावर पोहोचले. दिल्लीहून येणाऱ्या सिकंदराबाद एक्स्प्रेसने दोघेही निघाले. दुसऱ्या दिवशी सिकंदराबादला ( Underage Marriage ) ते पोहोचले.
इकडे प्रिया दिसत नसल्याने कुटुंबीयांनी वाडी पोलिस स्टेशनला तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख पोलिस निरीक्षक ललीता तोडासे आणि त्यांचे पथक या प्रकरणाचा तपास करीत होते. त्यांनी सुजयच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्याला नागपुरात येण्यासाठी बाध्य केले. पोलिसांच्या सततच्या दबावामुळे तो 13 जुलै रोजी नागपुरात पोहोचला. पोलिस पथकाने त्याला नागपूर रेल्वे स्थानकाहून ताब्यात घेतले. तर, अल्पवयीन प्रियाला कुटुंबीयांच्या स्वाधीन ( Underage Marriage ) केले.