Right To Education : आरटीईच्या आड 'मोफत शिक्षण'चा कोट्यवधींचा घोटाळा ! शिक्षण हक्काचा विश्वासघात उघड

22 Jul 2025 21:24:45
 
 Right  Education
 
नागपूर : ( Right To Education ) शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मुलांना मोफत शिक्षणाचा हक्क देणा-या प्राथमिक शाळांमधील 25 टक्के आरक्षित जागांवर प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली राज्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्याचा सूत्रधार शाहीद जमशेद शरीफ याच्यासह एकूण दहा आरोपींविरुद्ध सदर पोलिसांनी तब्बल १३,०४८ पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. आरटीई कायद्यानुसार, २५ टक्के शाळा प्रवेश प्रक्रिया शासनातर्फे राबवली जाते आणि शिक्षण विभागाच्या पडताळणी समितीच्या आदेशानंतर मुलांना शाळेत मोफत प्रवेश मिळतो.
 
परंतु, शाहीद शरीफने या प्रक्रियेचा गैरफायदा घेतला आहे. त्याने शिक्षण विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी 'सेटिंग' केले. त्यांना कमिशन देऊन राज्यभरातील शाळांमध्ये बोगस प्रवेश मिळवून दिले आणि हा मोठा घोटाळा केला आहे. यात, शहरातील प्रशांत हेडाऊ या पालकाने वेळापुरी पोद्दार शाळेत आपल्या मुलाला आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवून देण्यासाठी शाहीदला पैसे दिले. तर, राजेश बुवाडे यांनी देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूलमध्ये मुलाला प्रवेश मिळवून ( Right To Education ) घेतला होता.
 
या प्रकरणी सदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनीष ठाकरे यांनी गुन्हा दाखल केला. तपासामध्ये पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने सखोल चौकशी केली. या तपासात साक्षी-पुरावे, कागदपत्रांचे पुरावे आणि तांत्रिक पुरावे पोलिसांना मिळाले. या सर्व पुराव्यांची मांडणी करून, एकूण १३ हजार ४८ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल ( Right To Education ) करण्यात आले आहे.

असा आला घोटाळा उघडकीस ?
 
गटशिक्षण अधिकारी कवडू दुर्गे यांनी सदर पोलीस ठाण्यात बोगस प्रवेशाची तक्रार ( Right To Education ) दिली. तेव्हा हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा आणि त्यात शिक्षण विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली. गुन्ह्याच्या तपासात ठोस पुरावे मिळाल्यानंतर मास्टरमाईंड शाहीद शरीफचा भाऊ राजा जमशेद शरीफ, शाहीदची खास मैत्रीण रूपाली धमगाये उर्फ रुक्सार सय्यद, रोहीत पिल्ले आणि शुभम बुटे यांना अटक करण्यात आली. आरोपपत्रात अनिल मेश्राम, मंगेश झोटिंग, प्रदीप भांगे आणि पल्लवी हेडाऊ यांचाही समावेश आहे.
 
गुन्हा दाखल होताच, या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार शाहीद शरीफने पोलिसांना गुंगारा दिला आणि दुबईला पळाला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध 'लूकआऊट नोटीस' (Lookout Notice) जारी केली आहे. परंतु तो अजूनही दुबईतच वास्तव्यास आहे. शाहीदचा भाऊ राजा शरीफ याच्यावरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने एका अल्पवयीन मुलीशी गैरकृत्य करणे आणि बंदुकीने वन्यप्राण्याची शिकार करणे असे दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात मध्य प्रदेशातही गुन्हे दाखल आहे तर तो जबलपूर कारागृहात ( Right To Education ) बंदिस्त आहे.
 
Powered By Sangraha 9.0