नागपूर : ( Terror Accused Exit ) मुंबईत 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने सोमवारी महत्त्वाचा निकाल दिला. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 209 जणांचा मृत्यू झाला होता. तर 800 हून अधिक जण जखमी झाले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व 12 आरोपींना निर्दोष सोडले. यातील एतशाम सिद्धिकी (49), मीर अली शेरखान (50), नावेद सिद्धिकी आणि कमाल अंसारी हे चारही आरोपी आधी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात होते. 2016 मध्ये त्यांना नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले.
ऐतशाम, नावेद आणि कमाल या तिघांना फाशीची शिक्षा झाली होती. तर मीर अली हा जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. तिघांनाही फाशी यार्डात तर मीर अलीला अंडा बरॅकमध्ये ठेवण्यात आले होते. कमाल अंसारीला वगळता तिघेही मृत्यूची प्रतीक्षा करीत होते. फाशी यार्ड सर्व बरॅकपासून दूर असतो. त्यामुळे येथील कैद्याला कुणाशी बोलता येत नाही. अशा कैद्यांवर चोवीस तास पहारा असतो. प्रत्येक दिवस त्यांनी मृत्यूच्या प्रतीक्षेत जात होता. आज ते खुल्या वातावरणात ( Terror Accused Exit ) निघाले.
एक्झिटवर संशयाचे सावट
मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणातील दोन आरोपींची सोमवारी रात्री नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. सायंकाळी 7.55 वाजता ते कारागृहाबाहेर पडले. एतशाम सिद्धिकी (49) आणि मीरअली शेरखान (50) अशी सुटका झालेल्यांची नावे आहेत. या दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांचा तिसरा साथीदार नावेद सिद्धिकी हा कारागृहातच आहे. तर चौथा आरोपी कमाल अंसारी याचे कोरोनादरम्यान निधन ( Terror Accused Exit ) झाले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास कारागृह प्रशासनाला दोन्ही आरोपींच्या सुटकेचे आदेश मिळाले. प्रशासनाकडून याची माहिती आरोपींना देण्यात आली. कारागृहाबाहेर निघण्यापूर्वी दोघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली. कारागृह कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले आणि सायंकाळी 7.55 वाजता धंतोली पोलिसांच्या सुमो कारने रवाना झाले. धंतोली पोलिसांनी त्यांना अजनी चौकात सोडले. तेथून ते ऑटोने नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आणि इंडिगोच्या 6 ई 806 या विमानाने मुंबईसाठी रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. 2019 मध्ये नावेदने दादागिरी करीत इतर कैद्यांना मारहाण केली होती. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी 307 चा गुन्हा नोंदविला होता. त्यामुळे न्यायालयाचे आदेश आल्यानंतरही त्याची सुटका होवू शकली नाही. या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत त्याला कारागृहातच ( Terror Accused Exit ) राहावे लागेल.