दिल्ली : ( Priyanka Gandhi ) पावसाळी अधिवेशनाच्या नवव्या दिवशी बिहार मतदार पडताळणी आणि अमेरिकेच्या शुल्कवाढीच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ माजला होता. दरम्यान माध्यमांशी बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, ट्रम्प यांनी भारत-पाक युद्धविरामाबाबत केलेल्या विधानांबद्दलही सरकारने खुलासा करावा. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मध्यस्थीनंतर भारत-पाकिस्तानने युद्ध थांबवले. केंद्र सरकारला यावर उत्तर द्यावे लागेल, असे म्हणत त्यांनी ( Priyanka Gandhi ) मोदी सरकारवर निशाणा साधला.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% आयात शुल्क लादण्याची घोषणा केल्यानंतर सर्वत्र राजकारण तापले आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या ( Priyanka Gandhi ), पंतप्रधान मोदी जगभर फिरतात, सर्वत्र मित्रत्वाचं नातं बनवतात आणि शेवटी आपल्याला काय मिळतं ? टॅरिफ आणि आंतरराष्ट्रीय दबाव.
कौतुक करत कर लादला
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून येणाऱ्या सर्व वस्तूंवर टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर मोदी सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. व्हाईट हाऊसमधील संवादात ट्रम्प यांनी ब्रिक्स गटावर टीका करत भारताच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी रशियन तेल खरेदी आणि लष्करी व्यवहारांवरही बंदी आणि दंड लागू केला. यावर काँग्रेसने संताप व्यक्त करत पंतप्रधान मोदींनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसमोर ठामपणे उभे राहावे, अशी मागणी केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, “मोदी-ट्रम्प परस्पर कौतुक करीत राहिले, पण याचा काही उपयोग झाला नाही. पंतप्रधानांनी ट्रम्पच्या एकतर्फी निर्णयावर स्पष्टीकरण द्यावे.”