पारशिवनी : ( Death Mystery ) पेंच जलाशयाच्या डाव्या कालव्यात पटगोवारी येथील २८ वर्षीय महिलेने आपल्या पाच वर्षीय मुलासह उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १२) दुपारी दोन ते तीनच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिला अल्का शेखर बेहुने (२८) आणि तिचा मुलगा (५) असे असून, अल्काने मुलाला कमरेला बांधून पाण्याच्या प्रचंड प्रवाहात उडी घेतल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे. डावा कालवा हा भंडारा दिशेने पूर्ण क्षमतेने वाहत होता.
घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेशकुमार थोरात, पृथ्वीराज चव्हाण व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र बातमी लिहीपर्यंत आई व मुलाचे मृतदेह सापडले नव्हते. पोलिसांनी लवकरच मृतदेह मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, ती आत्महत्या आहे की अपघात, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी ( Death Mystery ) सांगितले.