RTMNU University Scam : विद्यापीठातील घोटाळा ! परीक्षा एक, निकाल दुसऱ्याचा तर गैरहजर ठरवून नापासचा शिक्का

24 Aug 2025 10:43:08
 
 RTMNU
 
नागपूर : ( RTMNU University Scam ) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात एक खळबळजनक प्रकार घडला आहे. ज्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात संताप व्यक्त केला जात आहे. बीबीएचा अभ्यासक्रम करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना बी.कॉम. अभ्यासक्रमाची गुणपत्रिका मिळाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, परीक्षेत प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत ‘गैरहजर’ दाखवून त्यांना नापास करण्यात आले आहे. हा प्रकारानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी थेट परीक्षा नियंत्रक कार्यालयावर धाव घेतली.
 
परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांनी आपली भूमिका मांडली ( RTMNU University Scam ) आहे. यावेळी वारिस खान यांनी सांगितले की, परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांमध्ये संवादाचा अभाव असल्याने हा गोंधळ झाला आहे. विद्यापीठाच्या या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असा आरोप वसीम खान यांनी केला. आम्ही परीक्षेला उपस्थित राहूनही आम्हाला गैरहजर दाखवून नापास केले आहे. एवढ्या मोठ्या विद्यापीठात असा गोंधळ कसा होऊ शकतो ? असा सवाल संतप्त विद्यार्थ्यांनी विचारला. हा केवळ टायपिंग किंवा संगणकीय चूक नसून, परीक्षा विभागाच्या बेजबाबदार आणि निष्काळजी कारभाराचे द्योतक आहे, असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला. त्यांनी तातडीने यात सुधारणा करून योग्य गुणपत्रिका देण्याची मागणी केली.
 
असे आहे स्पष्टीकरण
 
दरम्यान, परीक्षा विभागाचे मनीष झोडपे यांनी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत कोणतीही चूक नसल्याचा ठसठशीत ( RTMNU University Scam ) दावा केला आहे. ते म्हणाले, नवीन शिक्षण धोरणानुसार (एनईपी) बीबीए, बीसीए आणि बीकॉम हे तिन्ही अभ्यासक्रम एकाच गटात मोडतात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘बीकॉम’ असे मुद्रित केले जाईल. ‘गैरहजर’ दर्शवण्याबद्दल त्यांनी असे स्पष्टीकरण दिले की, एनईपीनुसार अभ्यासक्रमात 'मेजर' आणि 'मायनर' असे विषय असतात. संबंधित विद्यार्थ्यांच्या मायनर विषयात बदल झाल्याची शक्यता असल्याने त्यांना ‘गैरहजर’ दाखवले असावे, आणि विद्यार्थ्यांच्या गोंधळामुळे हा गैरसमज निर्माण झाला आहे, असेही ते म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0