नागपूर : ( Gajraj Seva ) गणेशचतुर्थीच्या पावन पर्वावर सगळेच गणरायाच्या सेवेत व्यस्त आहेत. गल्लोगल्लीत गुलालाची उधळण, दिपमाळांची रोषणाई आणि ढोल ताशांच्या गजरामुळे वातावरण भक्तीमय झाले आहे. अशात गणरायाची नित्सीम भक्ती करणारे शहरात असे एक डॉक्टर पिता पुत्र आहेत. ज्यांच्या अतूट सेवाभावी वृत्तीमुळे गजराजांची खरी सेवा आपल्याला अनुभवायला मिळते आहे. ही पिता-पुत्राची जोडी नित्यनियमाने घनदाट वनक्षेत्रातील गजराजांच्या आरोग्य सेवेत दहा दिवस व्यतीत करतात. डॉ. जेरील बानाईत आणि डॉ. अविनाश बानाईत असे या पितापुत्रांचे नाव आहे. त्यांच्या अवि फाऊंडेशन अंतर्गत गत दहा वर्षांपासून हे सेवाकार्य सुरू आहे. किर्र जंगलात, जेथे वाहने पोहचत नाहीत, मोबाईलला शुन्य कव्हरेज असते आणि विद्युत प्रवाह नसतो अशा ठिकाणी जाऊन सेवाकार्याचे आव्हानात्मक काम यंदाही त्यांच्याकडून केले जात आहे. राज्यात एकीकडे माधुरी हत्तीणीच्या भविष्याची चर्चा सुरू असताना, या निसर्गप्रेमी कुटुंबाने हत्तींच्या सेवेतून गणेशभक्तीचा अनोखा आदर्श समाजापुढे ( Gajraj Seva ) ठेवला आहे.
'हत्ती पोसणे कायमच न परवडणारे काम' अशी मराठीत म्हण आहे. पण मध्यप्रदेशच्या पेंच अभयारण्यात जेथे वाहने पोहचणार नाहीत इतक्या घनदाट भागात या हत्तींना ठेवले जाते. त्यांच्या पालनपोषणाई जवाबदारी वन विभागाने नियुक्त केलेल्या माहुतांवर असल्याचे अख्खे कुटुंब महीनोंमहीने जंगलातच राहते. गणेशोत्सवाच्या कार्यकाळात या हत्तींकडून कोणतेही काम करवून घेतल्या जात नाही. त्यांना उस, केळी व विविध रसाळ फळे दिले जातात. तेलाने मालिश करून आंधोळ घालून पूजाअर्चा केली जाते असे डॉ. जेरील बानाईत ( Gajraj Seva ) यांनी सांगितले.
माहुतांची आरोग्य तपासणी
फाऊंडेशनचे सदस्य मध्यप्रदेशमधील घनदाट पेंच जंगलातील हत्तींना औषधे देण्याचे काम इतक्या लिलया सांभाळतात की, गत काही वर्षांपासून मध्यप्रदेश वन विभागाने याच दहा दिवसांच्या कार्यकाळात अवि फाऊंडेशनच्या सहकार्यासाठी दक्षिण भारतातून हत्तींच्या उपचारार्थ वैद्यकीय तज्ज्ञांची चमू बोलाविणे प्रारंभ केल्याचे डॉ. जेरील म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे केवळ हत्तींचीच सेवा हा हेतू नसतो. त्यांच्या माहुतांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करून, औषधे देण्याचे कामही अवि फाऊंडेशनतर्फे होत असल्याचे त्यांनी सांगितले.