Nitin Gadkari : गडकरींच्या निवासस्थानी बॉम्ब, काय आहे यामागचं सत्य ?

03 Aug 2025 22:24:18
 
Nitin Gadkari
 
नागपूर : ( Nitin Gadkari ) रविवारी सकाळी 8.42 वाजता एक धक्क्कादायक फोन आला आणि सर्वांची तारांबळ उडाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवण्यात आला असून अवघ्या 10 मिनिटात तो फुटेल‌’, असा धमकी देणारा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाला. या धमकीच्या फोन कॉलने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आणि सर्वत्र पळापळ सुरु झाली. तत्काळ पोलिसांना सतर्क करण्यात आले. बॉम्ब शोध व नाशक पथक, श्वान पथक, क्युआरटीचे पथक गडकरी यांच्या निवासस्थानी रवाना झाले. त्यांच्या महाल आणि वर्धा मार्गावरील निवासस्थानाला पोलिस छावणीचे ( Nitin Gadkari ) स्वरूप आले होते.
 
पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. उमेश विष्णू राऊत (40) रा. विमा दवाखान्याजवळ, सक्करदरा असे ताब्यातील आरोपीचे नाव आहे. तो सक्करदरा परिसरात राहतो. रविवारी उमेशने 112 वर कॉल केला. उमेश अविवाहित असून तो एका दारूच्या दुकानात काम करतो. ‌‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवण्यात आला असून अवघ्या 10 मिनिटात तो फुटेल‌’, अशी धमकी वजा माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. या फोनमुळे पोलिस नियंत्रण कक्षात कर्तव्यावर असलेले सहायक पोलिस निरीक्षक मोरे यांनी त्वरित ही माहिती 8.56 च्या सुमारास कोतवाली ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रितेश आहेर यांना दिली.
 
सीएफएस यंत्राच्या माध्यमातून ही माहिती बीट मार्शल आणि वायरलेसवर प्रसारित करण्यात आली. मोबाईल नंबरवरून फोन कॉल मेडिकल चौक, सिरसपेठ परिसरातून करण्यात आल्याचे समजले. लगेच बीट मार्शलचा ताफा परिसरात पोहोचला आणि लगेच उमेशला ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध कलम 352, 353 (2) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. गडकरी यांचे महाल येथील निवासस्थान निर्माणाधीन असून बीडीडीएस, श्वान पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढला. दरम्यान, वर्धा मार्गावरील गडकरींचे ( Nitin Gadkari ) निवासस्थान प्रतापनगर ठाण्यांतर्गत येते. ही माहिती मिळताच प्रतापनगर पोलिसांनी बॉम्ब शोध व नाशक पथक, श्वान पथक पाठविले. संपूर्ण घर आणि इमारत परिसर पिंजून काढला. सोबतच पोलिसांचा चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
 
मित्रानेचा केला घात
 
उमेशने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो त्याच्या चार मित्रांसोबत सक्कदरा परिसरात भाड्याच्या खोलीत राहतो. रविवारी सकाळच्या सुमारास उमेशच्या मित्राने त्याला मोबाईल मागितला. ‌‘वडिलांना फोन करायचे आहे‌’, असे सांगून फोन घेतला आणि 8.42 वाजता 112 वर कॉल केला. तो पेंटिंगचे काम करतो. मोबाईलधारकाचा पत्ता तुळशीबाग रोड, भुतिया दरवाजा, महाल असा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस आता उमेशच्या मित्राचा शोध घेत आहेत. त्याच्या अटकेनंतरच ‌‘हा खोडसाळपणा आहे कि दारूच्या नशेत फोन कॉल‌’ हे स्पष्ट होईल.
 
 
Powered By Sangraha 9.0