MLA House Robbery : जळगाव हादरलं ! चक्क माजी आमदाराच्या घरात लाखोंची चोरी

Top Trending News    04-Aug-2025
Total Views |
 
mla
 
जळगाव : ( MLA House Robbery ) जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी थेट माजी आमदारांच्या घरातच धाडसी चोरी केली आहे. पारोळा तालुक्यातील राजवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार साहेबराव पाटलांच्या बंगल्यातून चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे. माजी आमदार पाटील आपल्या मुलाकडे नाशिकला गेले होते. तेव्हा चोरट्यांनी बंद घर फोडल्याचे समोर आले आहे. यात 34 लाखांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे. 24 लाखांच्या दागिन्यांसह 10 लाखांची रोकड लांबवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
 
घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चार चोरटे कैद झाले आहेत. त्यांच्या हालचाली, वर्णन, कपड्यांवरून ते पुढे एखाद्या सीसीटीव्हीत कैद झालेत का, याचा पोलिस तपास करत आहेत. घराच्या सर्व दरवाजांचे कुलूप तोडून चोरट्यांनी 34 लाख 8 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला ( MLA House Robbery ) आहे.
 
सीसीटीव्ही फोडून चोरट्यांचा धुमाकूळ
 
चोरट्यांनी सीसीटीव्ही पाहताच तो फोडून टाकला. पोलिसांना पुरावे मिळू नयेत म्हणून डीव्हीआर सुद्धा चोरून नेला. मात्र एका सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले. धरणगाव रस्त्याकडून ते बंगल्यात शिरले. कुंपणभिंतीवरून उडी घेत त्यांनी बंगल्यात प्रवेश केला. पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्यांनी बंगल्याची कुलुपे तोडली. नंतर अर्ध्या तास बंगल्यात धुमाकूळ घालत ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.