नागपूर : ( Silent Robbery ) घरातील सदस्य घरात असतांना चोरी झाल्याची आश्चर्यकारक घटना नागपुरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत घडली आहे. शुक्रवारी रात्री 9.40 वाजताच्या सुमारास संजय हे मुलीसोबत हॉलमध्ये बसून टीव्ही पाहात होते. त्यांच्या घराचे मागचे दार उघडेच होते. कुटुंब टीव्ही पाहण्यात मग्न असल्याची संधी साधून अज्ञात चोराने मागच्या उघड्या दारातून घरात प्रवेश केला. बेडरूमच्या कपाटातून रोकड आणि दागिन्यांसह एकूण 5 लाख 24 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून ( Silent Robbery ) नेला.
ही खळबळजनक घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत घडली. कुटुंब टीव्ही पाहण्यात मग्न असल्याची संधी साधून चोराने आपला डाव साधला. उघड्या दारातून प्रवेश केला आणि बेडरूममध्ये जाऊन कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख 1.44 लाख चोरी करून पसार झाला. जवळपास 15 मिनिटानंतर संजय बेडरूममध्ये गेले तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे समजले. या प्रकरणी पोलिसांनी संजय रामकृष्ण सोनवणे (56) रा. हर्षलनगर, हुडकेश्वर रोड यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. सोनवणे यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ओळखीतीलच कोणीतरी ही चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपास सुरू करण्यात आला आहे.