Praful Patel : नाराजी टाळण्यासाठी स्वतंत्र रणनिती ? प्रफुल्ल पटेलांनी थेट भाजपला डिवचलं

11 Jan 2026 20:48:52

patel
 
नागपूर : ( Praful Patel ) राज्यात सत्ता असताना सर्वकाही आम्हीच केल्याचा आव आणला जात आहे. आम्हीही सरकारचा भाग आहोत. त्यामुळे जे चांगले होतेय त्याचा वाटा आमचाही आहे. परंतु, नागपूरच्या विकासाचे काम करताना काहींविरोधात नाराजीही आहे. ही नाराजी आमच्यावर ओढवू नये म्हणून आम्ही मनपा निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरलो, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल ( Praful Patel ) यांनी भाजपला डिवचले.
 
प्रभाग क्र. २८ ते ३३ पर्यंतच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले असता ते अयोध्यानगरमधील प्रचारसभेत बोलत होते. पाणीप्रश्न सुटलेला नाही. लहान मोठे कर सरकारला दिल्यानंतरच कामे होतात. त्यामुळे सरकारबद्दल नाराजी आहे. मालकीपट्टे व नाल्याचा प्रश्न आहे. त्यामुळेच आमचे उमेदवार रिंगणात आहेत. वेगळे लढत असलो तरीही नागपूरकरांचे प्रश्न सोडवू. नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहू. निधी खेचून आणू, अशी ग्वाही देत प्रफुल्ल पटेल ( Praful Patel ) यांनी मिहान व आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आपण मोठे काम केल्याचे सांगितले.
 
पटेल ( Praful Patel ) यांची शहरातील पाचही विधानसभा मतदारसंघात प्रचार रॅली व जाहीर सभा पार पडल्या. यावेळी त्यांनी विकासाचा जाहीरनामा जनतेसमोर मांडला. यात स्थानिक पायाभूत सुविधा, आरोग्य सेवांचे बळकटीकरण, महिलांचे सक्षमीकरण आणि तरुणांसाठी स्थानिक रोजगार निर्मितीवर भर दिला. पक्षाचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जैन, शहराध्यक्ष अनिल अहिरकर, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, उमेदवार राजू नागुलवार, आभा पांडे, अशोक काटले, तानाजी वनवे, प्रवीण पाटील, प्रशांत पवार, राजाभाऊ टांकसाळे व इतरांचा सहभाग होता.
 
कामांचा मोठा अजेंडा
 
नागपूर शहर वरून चकाचक दिसते. आतमध्ये गेल्यावर अंधार दिसतो. शहरात अनेक कामे करायची आहेत. पक्षाच्या उमेदवारांमध्ये दिवसरात्र काम करण्याची तळमळ आहे. त्यामुळेच ते जनतेसमोर आले. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही प्रफुल्ल पटेल ( Praful Patel ) यांनी दिली.
 
'लाडकी बहीण'वरून महायुतीत श्रेयनाट्य
 
'लाडक्या बहिणीचे श्रेय एकाचे नाही. राष्ट्रवादीचाही त्यात वाटा आहे. आमच्या वाट्याचा हक्क कुणीही हिरावू शकत नाही. प्रामाणिकपणे काम करीत आहो. त्यामुळे आम्ही महायुतीचा धर्म पाळतो. तशी ती सर्वांची जबाबदारी आहे. चौकार, षटकार मारून फायदा नाही. एक-दोन धावा करूनही शतक करता येते, असे सांगत प्रफुल्ल पटेल ( Praful Patel ) यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीकेचा बाण सोडला.
 
आज आम्ही नागपूरच्या जनतेसमोर जो विकासाचा जाहीरनामा मांडला आहे. तो शहराचा कायापालट करणारा ठरेल. नागपूर शहरात पक्षाने भक्कम बांधणी केली. त्याचे श्रेय स्थानिक नेतृत्व व कार्यकर्त्यांना जाते. यंदा परिवर्तनाची लाट आहे. राष्ट्रवादीला शहरात अभुतपूर्व यश मिळेल.
- प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस(अप)
Powered By Sangraha 9.0