नागपूर : (Vanchit Bahujan) महापालिका निवडणूक ही फक्त नगरसेवक निवडण्याची प्रक्रिया राहिलेली नाही तर राज्यातील राजकीय शक्तींच्या खऱ्या भूमिकेची चाचणी ठरत आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये काँग्रेस, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, बसपा यांच्यासोबतच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी रिंगणात आहे. मात्र, प्रत्येक निवडणुकीत वंचितचा पाठलाग करणारा एक प्रश्न यावेळी अधिक तीव्रतेने उपस्थित झाला आहे. तो म्हणजे वंचित खरंच पर्यायी राजकारण करीत आहे की भाजपची ‘बी टीम’ म्हणून काम करीत आहे ?
त्यामुळे नागपुरात ‘वंचित’ची (Vanchit Bahujan) खरी कसोटी होणार आहे. प्रकाश आंबेडकर दलित, बहुजन, ओबीसी, अल्पसंख्याकांच्या हक्कांची भाषा करतात. वैचारिक पातळीवर भाजप, आरएसएस आणि हिंदुत्ववादी राजकारणावर त्यांनी सातत्याने हल्ले चढवले आहे. विशेषतः आरएसएसचे मुख्यालय असलेल्या नागपूरवर त्यांनी अनेकदा टीका केली आहे. मात्र, याच नागपूरमध्ये चाललेल्या प्रचारात तो आक्रमक अँटी-आरएसएस सूर तितकासा ठळकपणे जाणवत नाही. ही बाब अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे. भाजपवर टीका होते, पण आरएसएसविरोधी धार बोथट का वाटते, हा प्रश्न उपस्थित होतो. वंचितच्या भूमिकेवर संशय वाढण्यामागे केवळ प्रचाराची शैली नाही तर मागील अनुभवही आहे. मुंबई महापालिकेच्या राजकारणात वंचितने काँग्रेससोबत आघाडी (Vanchit Bahujan) केली होती. ऐनवेळी काही जागांवर वंचितने उमेदवारच उभे न करता राजकीय ड्रामा केला. त्या घटनेनंतर ‘आघाडी’ ही केवळ दिखावा होती का, असा सवाल उभा राहिला. याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्येही वंचितची प्रत्येक हालचाल संशयाच्या नजरेतून पाहिली जात आहे.
नागपूरमध्ये काँग्रेससोबत (Vanchit Bahujan) युतीचा प्रयत्न झाल्याची चर्चा होती. मात्र, वंचितच्या उमेदवारानेच थेट आरोप केला की नागपूरमधील काँग्रेस भाजप चालवत आहे. यानंतर वंचितने युती पासून हात आखडता घेतला. हा आरोप राजकीयदृष्ट्या स्फोटक असला तरी त्याचा थेट फायदा कोणाला होतो, याचे उत्तर नागपूरचे राजकीय वास्तव देते. भाजपला. काँग्रेस कमकुवत, ठाकरे गट मर्यादित आणि शिवसेना, राष्ट्रवादी विभाजित असताना वंचित (Vanchit Bahujan) स्वतंत्र लढत देऊन भाजपविरोधी मतांचे विभाजन करीत आहे, असा आरोप त्यामुळे अधिक बळावतो. नागपूरमध्ये दलित व बहुजन मतदारांची संख्या निर्णायक आहे. काही प्रभागांमध्ये वंचितला चांगली मते मिळू शकतात, यात शंका नाही. मात्र, प्रश्न असा आहे की ही मते भाजपला पराभूत करण्यासाठी वापरली जात आहेत की भाजपला अप्रत्यक्ष मदत करण्यासाठी ? वंचित स्वतः सत्ता मिळवू शकणार नाही, हे वास्तव आहे. परंतु, ती किंगमेकर ठरू शकते का, हाही प्रश्न आहे. मात्र, किंगमेकर होण्यासाठी विरोधी शक्तींना एकत्र आणावे लागते, फूट पाडावी लागत नाही.
राजकारणात शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची
प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan) कायम म्हणतात, आम्ही कोणाची ‘बी टीम’ नाही. आम्ही स्वतंत्र राजकारण करतो. परंतु, राजकारणात शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची असते. मुंबईतील अपूर्ण आघाडी, नागपूरमधील अर्धवट युती प्रयत्न, काँग्रेसवर थेट आरोप आणि भाजप-आरएसएसवर तुलनेने मवाळ भूमिका या सगळ्या गोष्टी एकत्र पाहिल्या तर संशय निर्माण होतो. विशेषतः नागपूरसारख्या शहरात, जिथे आरएसएसचा थेट प्रभाव आहे, तिथे त्या मुद्द्यावर आक्रमकता दिसत नसेल तर प्रश्न उपस्थित होणारच.
पर्यायी राजकारण उभं करणार ?
नागपूर महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan) सत्ता हस्तगत करणार नाही. परंतु, ती भाजपचा विजय सुकर करणार की खऱ्या अर्थाने पर्यायी राजकारण उभं करणार, हे निकाल ठरवतील. ‘भाजपची बी टीम’ हा आरोप मतदार नाकारतात की स्वीकारतात हेच वंचितच्या राजकीय भवितव्याचं निर्णायक मापदंड ठरणार आहे. दलित-बहुजन मतांचा उपयोग सत्तेला आव्हान देण्यासाठी होतो की फक्त गणितं बिघडवण्यासाठी, याची उत्तरं नागपूर देणार आहे.