रामटेक : ( Gangabai Sakhare ) अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झालेली असताना रामटेक शहरातील आंबेडकर वॉर्डमध्ये विलक्षण घटना घडली. १०३ वर्षीय मृत वृद्ध महिलेने अचानक पाय हलविले अन् परिसरात एकच खळबळ उडाली, क्षणभरातच शोकसागरात बुडालेले वातावरण आनंदी झाले अन् आप्तेष्टांनी एकमेकांना आलिंगन दिले.
गंगाबाई सावजी साखरे ( Gangabai Sakhare ) या गेल्या दोन महिन्यांपासून गंभीर आजारामुळे अंथरुणाला खिळून होत्या. १२ जानेवारीच्या संध्याकाळी त्यांनी कोणतीही हालचाल न केल्याने आणि श्वासोच्छ्वास जाणवत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज बांधला. त्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. नातेवाईकांना कळविण्यात आले, मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरली, मंडप उभारण्यात आला आणि अंत्यसंस्कारासाठी आवश्यक साहित्यही आणण्यात आले. मात्र, काही वेळानंतर लगेचच नातेवाईकांनी अचानक गंगाबाईंच्या ( Gangabai Sakhare ) पायाच्या बोटांनी हालचाल बघितली. हे दृश्य पाहताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांच्या हातपायांवरील बांध सोडले आणि नाकाती कापूस काढला अन् गंगाबाई रोजच्या सारख्या पुन्हा श्वास घेऊ लागल्या.
काही क्षणांतच उपस्थित नातेवाईक आणि नागरिक स्तब्ध झाले. घटनेची माहिती मिळताच अंत्यसंस्कारासाठी दूरवरून आलेल्या नातेवाईकांना गंगाबाई ( Gangabai Sakhare ) जिवंत असल्याचे कळविण्यात आले आणि अंत्यसंस्काराची तयारी तत्काळ रद्द करण्यात आली. विशेष म्हणजे, १३ जानेवारी हाच गंगाबाईंचा वाढदिवस असल्याने कुटुंबीयांनी हा क्षण ‘नवजीवनाचा दिवस’ मानत साधेपणाने वाढदिवस साजरा केला. ही दुर्मिळ आणि थक्क करणारी घटना सध्या रामटेक शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.