नागपूर : ( Beggars To VIP ) शहराच्या चौकाचौकात दोन चार रुपये भीक मागून जगणे नशिबी आले. दिवसाला दया म्हणून मिळालेल्या पैश्याच्या भरवशावर त्यांची भूक तहान भागू लागली. पण एकदिवस महापालिकेने केलेल्या कारवाईत त्यांना चौकातून उचलून आस्था भिक्षेकरी पुनर्वसन केंद्रात आणण्यात आले आणि तिघांचेही आयुष्याच बदलले. आनंदाची गोष्ट अशी की, आज तिघांनाही राजधानी दिल्लीत होणाऱ्या परेडचे निमंत्रण आले आहे. होय, नागपुरातील तीन कधीकाळी भिकारी असलेले तिघे येत्या २६ जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाचे साक्षीदार होणार आहेत.
महानगरपालिका व सह्याद्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेला ‘आस्था भिक्षेकरी पुनर्वसन निवारा केंद्र’ हा उपक्रम समाजातील वंचित घटकांसाठी आशेचा किरण ठरतो आहे. मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या पुढाकारातून व अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी तसेच उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या प्रकल्पात सन २०२२ पासून १३३० हून अधिक भिक्षेकऱ्यांना वाचविण्यात आले. तसेच भिकाऱ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कामही हा प्रकल्प करतो आहे. निवारा, आरोग्यसेवा, समुपदेशन, कौशल्य विकास व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना सन्मानाचे जीवन जगण्याची संधीही ( Beggars To VIP ) देतो आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, नागपूर येथील तीन पुनर्वसित लाभार्थ्यांना 26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास देशभरातून निवडलेल्या 100 विशेष आमंत्रितांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. निवड झालेल्या लाभार्थींमध्ये शरीफ शेख (वय : 61 वर्षे), अनिल जुनघरे (वय : 52 वर्षे) आणि गायाबाई शुक्ला (वय : 70 वर्षे) यांचा समावेश आहे. स्माइल आस्था उपक्रमाबाबत प्रशंसनीय स्वयंलिखित पत्र व प्रसिद्ध झीरो माइलची प्रतिमा ते मा. राष्ट्रपति व मा प्रधानमंत्र्यांना भेट स्वरूपात ( Beggars To VIP ) देणार आहेत.
नागपूर महानगरपालिका व सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या ( Beggars To VIP ) माहितीनुसार ‘आस्था’ व स्माइल उपक्रम हा भिक्षेकरीमुक्त, सर्वसमावेशक आणि सशक्त समाजनिर्मितीच्या भारत सरकारच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असून, पुनर्वसनाच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना आत्मनिर्भर बनविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे. राष्ट्रीय पातळीवरील या महत्त्वाच्या कार्यक्रमात पुनर्वसित लाभार्थ्यांचा सहभाग हा शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांचा यशस्वी परिणाम आहे. या लाभार्थ्यांसोबत कार्यालयीन प्रतिनिधी गौतम नागरे वार्डन, राकेश गाठे व्यवस्थापक व अनिता गंधर्वार अधीक्षिका देखील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.