नागपूर : ( Lonar In Danger ) जागतिक वारसा असलेल्या लोणार सरोवराची सद्यस्थिती आणि तिथल्या वाढत्या पाणीपातळीमुळे निर्माण झालेल्या धोक्याची दखल घेत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. सरोवराचे नैसर्गिक अस्तित्व टिकवण्यासाठी आणि परिसरातील प्राचीन मंदिरांचे संरक्षण ( Lonar In Danger ) करण्यासाठी ही याचिका सादर करण्यात आली आहे. याचिकेवर हायकोर्टाने नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, ग्राम विकास पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव , पीडब्ल्यूडीचे प्रधान सचिव, वन व महसूल प्रधान सचिव, पर्यावरण , सिंचन विभागांचे प्रधान सचिव, अमरावतीचे विभागीय आयुक्त, बुलढाणाचे जिल्हाधिकारी, लोणारचे तहसीलदार , नगर परिषद यांना नोटीस बजावली. न्या. अनिल किलोर आणि न्या. राज वाकोडे यांनी दोन आठवडयात सर्व प्रतिवादींना उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत.
याचिकेत नमूद केल्यानुसार, गेल्या काही काळापासून लोणार सरोवराची पाणी पातळी तब्बल २० फुटांनी वाढली आहे. यामुळे सरोवराच्या काठावरील प्राचीन मंदिरे, कमळजा देवी मंदिर, दैत्य सुदन मंदिर आणि मोठा मारुती मंदिर धोक्यात आली आहेत. सद्यस्थितीत १५ पैकी ९ मंदिरे पूर्णत: किंवा अंशत: पाण्याखाली गेली असून कमळजा देवीच्या मूतीर्लाही ( Lonar In Danger ) पुराचा धोका निर्माण झाला आहे.
शहराचे सांडपाणी थेट सरोवरात सोडले जात असल्याने सरोवराच्या पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे. सरोवराभोवती मोठ्या प्रमाणात केलेल्या वृक्षारोपणामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढली आहे, परिणामी पाण्याचे बाष्पीभवन न होता ते झिरपून सरोवरात जात आहे. २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सरोवरात मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून बाहेर पडण्यास मार्ग नसल्याने पातळी वाढत आहे. सरोवराचे पाणी गोड होत असल्याने त्यातील गुलाबी रंगासाठी कारणीभूत असलेले शैवाल आणि सूक्ष्मजीव धोक्यात ( Lonar In Danger ) आले आहेत. कोर्ट मित्र अॅड. मोहीत खजांची, सरकारतर्फे अॅड. नितीन राव यांनी बाजू मांडली.
कोर्टाकडे करण्यात आलेल्या मागण्या
कोर्ट मित्र अॅड. मोहीत खजांची यांनी या मागण्या केल्या आहेत. पाणी वळवण्याची योजना: मंदिरांचे नुकसान टाळण्यासाठी तात्काळ 'इमर्जन्सी वॉटर डायव्हर्जन प्लॅन' राबवण्यात यावा. सरोवराच्या ( Lonar In Danger ) संवर्धनासाठी एका स्वतंत्र तज्ज्ञ समितीची स्थापना करावी. सरोवरात पाणी येण्याच्या नेमक्या स्त्रोतांचा शोध घेऊन आयआयटी मुंबईने आपला अंतिम अहवाल लवकरात लवकर सादर करावा. सरोवराच्या पाण्याची पीएच पातळी आणि क्षारता तपासण्यासाठी 'रिअल-टाइम वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन' उभारण्यात यावे.