नागपूर : ( Chandrashekhar Bawankule ) आगामी महानगरपालिका निवडणुका भावनांवर नव्हे, तर विकासाच्या मुद्यांवर लढल्या जात आहेत. राज्यातील जनता भाजप व महायुतीसोबतच असल्याचा ठाम विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी व्यक्त केला. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे आमचे स्टार प्रचारक असून त्यांचा प्रचार दौरा महायुतीसाठी निर्णायक ठरेल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जाहीरनाम्यांचा उल्लेख करीत त्यांनी टोला लगावला की, कितीही घोषणा केल्या किंवा प्रखर टीका केली, तरी जनता त्याकडे लक्ष देणार नाही. ही निवडणूक पूर्णपणे विकासाच्या अजेंड्यावर असेल. जनता देवेंद्र फडणवीस यांच्या 'विकसित महाराष्ट्राच्या' संकल्पनेला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या आदर्शांवर चालणाऱ्या शिवसेनेला पूर्ण पाठिंबा देईल.
महायुतीवर परिणाम नाही
अजित पवार यांच्या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले की, समन्वय समितीच्या बैठकीत एकमेकांवर भाष्य न करण्याचा निर्णय झाला आहे. धोरणाशी विसंगत विधाने झाली तरी त्याचा महायुतीच्या एकजुटीवर कोणताही परिणाम होणार नाही. संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, निराधार विधाने करण्यात काहीच अर्थ नाही. भाजप-महायुती २०४७ पर्यंत एकत्र राहून हिंदुत्व आणि विकासाच्या तत्त्वांवर पुढे जाईल. मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाचे श्रेय देताना त्यांनी स्पष्ट केले की, मुंबईच्या विकासाचा खरा चेहरा देवेंद्र फडणवीस आहेत आणि उद्धव ठाकरे यांचा या प्रकल्पांशी कोणताही संबंध नाही.
मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध चर्चासत्रे आणि प्रसारमाध्यमांच्या मुलाखतींमध्ये भाग घेण्यासोबतच, देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्व २९ महानगरपालिका क्षेत्रांना वैयक्तिकरित्या भेट देणार आहे. मी स्वत: विदर्भ, मराठवाडा, पुणे, नाशिक आणि धुळे या विभागांचा दौरा करणार असून विदर्भातील ९ महानगरपालिकांच्या संपर्कात राहणार असल्याचे बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी सांगितले.