Korean Fighter Jets : नागपूरच्या आकाशात चक्क कोरियन लढाऊ विमानांचा गडगडाट

Top Trending News    01-Feb-2026
Total Views |

fighter
 
नागपूर - ( Korean Fighter Jets ) शनिवारी दुपारी नागपूरच्या आकाशात अचानक घुमलेल्या लढाऊ विमानांच्या गडगडाटाने शहरवासी दचकले. दुपारी सुमारे ४ ते ४.३० वाजताच्या दरम्यान कोरियन हवाई दलाची तब्बल १० युद्धविमाने नागपूर विमानतळावर उतरल्याने शहरात एकच खळबळ उडाली. काही मिनिटांपूर्वीच प्रचंड आवाज करत एक लढाऊ विमान आकाशातून झेपावल्याने नागरिकांचे लक्ष वर गेले आणि काही काळासाठी उत्सुकतेसोबतच घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमानांचा वेग आणि आवाज इतका तीव्र होता की काही भागांमध्ये क्षणभर दैनंदिन कामकाजही थांबले. या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल होताच चर्चांना उधाण आले. रविवारी सकाळी सातच्या सुमारास या विमानांनी उड्डाण भरले त्यानंतर अनेकांनी सुटकेच्या निश्वास सोडला.
 
उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, कोरियन हवाई दलाची ( Korean Fighter Jets ) ही विमाने नागपूर विमानतळावर पार्किंगसाठी दाखल झाली आहेत. मात्र त्यांचे नागपूरमध्ये येण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही विमाने हैदराबाद येथे आयोजित ‘विंग्स इंडिया २०२६’ या आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक प्रदर्शनासाठी आली होती की भारतीय हवाई दलासोबत संयुक्त सरावासाठी येथे थांबली, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. भारतीय हवाई दलाकडून मात्र अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
 
विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था
 
विंग्स इंडिया २०२६’ हे प्रदर्शन २८ ते ३१ जानेवारीदरम्यान हैदराबादच्या बेगमपेट विमानतळावर ( Korean Fighter Jets ) पार पडले. आशियातील सर्वात मोठ्या नागरी विमानवाहतूक प्रदर्शनांपैकी एक असलेल्या या कार्यक्रमात कनेक्टिव्हिटी, विमाननिर्मिती, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वततेतील प्रगती यांचे सादरीकरण करण्यात आले. एरोबॅटिक शो, ३४ विमानांचे प्रदर्शन तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आणि सहकार्याविषयी चर्चा ही प्रमुख आकर्षणे ठरली. दरम्यान, नागपूर विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. संत्रानगरीच्या आकाशात घुमलेला हा गडगडाट मात्र सध्या शहरभर चर्चेचा विषय ठरला आहे.