नागपूर : ( Farmers Protest ) भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार कराराने देशातील बळीराजा संकटात येणार आहे. राज्यातील मका, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार असल्याने याविरोधात पक्षातर्फे आंदोलन उभारण्याची घोषणा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
पक्षश्रेष्ठीसोबत दिल्लीत शुक्रवारी झालेल्या बैठकीत भारत अमेरिका करार त्याचे शेतकऱ्यांवर होणारे परिणाम यावर चर्चा झाली. तसेच, आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात आली. यवतमाळला ७ मार्च रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. अमेरिकेतून येणाऱ्या मालावर शून्य टक्के कर, तर भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर दहा टक्के कर आकारला जाणार आहे. या तफावतीमुळे राज्यातील कापूस, मका, तूरडाळ आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होईल, अशी भीतीही वडेट्टीवार यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त ( Farmers Protest ) केली.
सद्यस्थितीत कापूस साडे चार हजार रुपयाने तर, मक्याला केवळ दीड हजार रुपये भाव मिळत आहे. सोयाबीनचे भाव कोसळले असताना राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा 'शक्तिपीठ' महामार्गासाठी जमिनी बळकावण्यात जास्त रस आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करणारे हे सरकार आहे, अशी तोफही वडेट्टीवार ( Farmers Protest ) यांनी डागली.
२२ हजार शाळा बंद
मुंबईचे ( Farmers Protest ) 'गुजरातीकरण' करण्याच्या प्रयत्नात मराठी शाळांचा बळी दिला जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. राज्यात तब्बल २२ हजार शाळा बंद पडल्या आहेत, तर चार हजार शाळांमध्ये शिक्षकच नाहीत. यावरून जाणीवपूर्वक शाळा बंद करण्याचा घाट सरकार घालत असल्याचे लक्षात येते. मराठी माणूस राजधानीतून हद्दपार व्हावा, हे सरकारचे धोरण आहे का, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
चूक नसताना मी माफी का मागेन ?
दिल्लीच्या ( Farmers Protest ) बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. चंद्रपूर प्रकरणात काही चूक नसताना मी माफी का मागेन ? काही हितशत्रू जाणूनबुजून बातम्या पेरत आहे, स्वतःची नगरपरिषद ज्यांना जिंकता आली नाही, ते इतरांना प्रश्न विचारत आहे, असा हल्ला त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांवर चढवला.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी भिवंडी न्यायालयात उपस्थित होते. ते कोणत्याही दबावाला घाबरणारे नाहीत. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांची भीती वाटते, हे वारंवार सिद्ध झाले आहे. सत्यासाठी लढणाऱ्या माणसाला अशा कारवायांनी रोखता येणार नाही. कितीही केसेस केल्या तरी काँग्रेस लढत राहील, असा निर्धारही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.