नागपूर : नागपूरातील श्री पोद्दारेश्वर राम मंदिर तर्फे दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येते. श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा ( Ram Navami ) यंदा २६ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडणार आहे. या वर्षीच्या झांकीत भगवान शिव व माता पार्वती आपल्या पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांच्या पूजेला प्रेमाने निहारताना दिसत आहे. तसेच भारतभरातील १२ पवित्र ज्योतिर्लिंगांचे दर्शनही या झांकीतून घडवले जाणार आहे.
या शोभायात्रेत ( Ram Navami ) श्री बैद्यनाथ आयुर्वेद भवन यांच्या वतीने “भगवान शिव-पार्वतीची आराधना करत असलेले गणेशजी व कार्तिकेय तसेच १२ ज्योतिर्लिंग दर्शन” ही भव्य आणि आकर्षक झांकी सादर केली जाणार आहे. १९१७ साली बैद्यनाथ धाम देवघर येथे वैद्यराज पं. रामनारायण शर्मा यांनी स्थापन केलेले बैद्यनाथ आयुर्वेद भवन गेल्या १०८ वर्षांपासून आयुर्वेद क्षेत्रात अग्रगण्य आहे. नागपूरमध्येही सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि धार्मिक उपक्रमांमध्ये या संस्थेचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
यापूर्वीही बैद्यनाथ प्रतिष्ठानने “श्रीराम शक्तिप्रदर्शन”, “तिरुपती बालाजी दर्शन”, “विठ्ठल-रुक्मिणी दर्शन”, “नृसिंह अवतार”, “शिव पार्वती विवाह”, “रामेश्वरम् पूजन” यांसारख्या रामनवमीच्या ( Ram Navami ) अनेक देखण्या झांक्यांद्वारे भाविकांची मने जिंकली आहेत. त्यामुळेच लाखो नागरिक या झांकीची आतुरतेने वाट पाहत असतात.
यंदाची झांकी सुप्रसिद्ध मूर्तिकार दिपक शरद इंगळे यांनी साकारली असून विद्युत सजावट गोलू इलेक्ट्रिकल्सकडून केली जाणार आहे. ही कलाकृती संपूर्ण शोभायात्रेतील प्रमुख आकर्षण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या द्वादश ज्योतिर्लिंगांमध्ये सोमनाथ मंदिर, महाकालेश्वर मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, केदारनाथ मंदिर आदी पवित्र स्थळांचा समावेश आहे. हिंदू धर्मानुसार या ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाने मोक्षप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.
झांकीचे संचालन श्री प्रमोद लुटे व प्रतिष्ठानचे सेवाभावी कार्यकर्ते करणार असून पत्रकार परिषदेत वैद्य श्री रमेश शर्मा, श्याम खडतकर, राजेंद्र शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. यंदाची ही भव्य झांकी आणि शोभायात्रा नागपूरकरांसाठी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्व ठरणार आहे.